हेरांनी माहिती देताच पोलिसांनी उधळला त्यांचा मोठा डाव 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संचारबंदीच्या कामात व्यस्त असल्याने गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात मागील दोन वर्षात नक्षल चळवळीला मोठे धक्के बसले. यातून सावरण्यासाठी जहाल नक्षलवादी सृजनक्कावर मोठी जबाबदारी टाकली होती. ही जबाबदारी सांभाळत असतानाच लॉकडाउनमध्ये मोठा घातपात घडवून आणण्यासाठी तिने रचलेले कटकारस्थान अखेर पोलिस खबऱ्यामुळे यशस्वी झाले नाही. मात्र, या प्रयत्नात विभागस्तरावर नक्षलवाद्यांचे नेतृत्व पंगू झाले असून गडचिरोली पोलिस दलाने मोठी कामगिरी केली आहे. 

छत्तीसगड सीमेलगत असलेल्या एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी जंगल परिसरात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत नक्षलवाद्यांच्या विभागीय कमिटीची सदस्य तथा कसनसूर दलमची जहाल महिला नक्षलवादी सृजनक्‍का ऊर्फ चिनक्‍का ऊर्फ जैनी चैतू अर्का हिला पोलिसांनी शनिवारी, २ मे रोजी ठार केले. तिच्यावर छत्तीसगड व महाराष्ट्र सरकारने 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संचारबंदीच्या कामात व्यस्त असल्याने गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे. रस्ते व पुलाच्या कामावरील वाहनांची जाळपोळ तसेच पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोन नागरिकांची हत्या करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न जहाल माओवादी सृजनक्‍काच्या नेतृत्वात सुरू होता.

अवश्य वाचा-  जहाल महिला नक्षली सृजनाक्काचा पोलिसांनी केला खात्मा

पोलिस पथकावर मोठा हल्ला करून कसनासूर येथे ठार झालेल्या 40 नक्षलवाद्यांचा बदला घेण्यासाठी तिने छत्तीसगड सीमेलगत कसनसूर व चातगाव दलमच्या सदस्यांना एकत्र करून व्यूहरचना आखली होती. मात्र, नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती पोलिस खबऱ्यांकडून नक्षलविरोधी अभियान पथकाला मिळताच त्यांनी सिनभट्टी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. तेव्हा जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. परंतु पोलिसांनी प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सृजनक्‍का ठार झाली. गेल्या वर्षी महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्‍यातील जांभुळखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या घटनेतही सृजनक्‍काचा हात असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सृजनक्‍काचा पती केंद्रीय संघटनेचा सदस्य 

सृजनक्‍काचा पती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय संघटनेचा सदस्य असून सृजनक्‍काकडे महिलांना नक्षल चळवळीत सहभागी करून घेण्याची जबाबदारी होती. जहाल नक्षली नेता नर्मदाक्काच्या नेतृत्वात झालेल्या अनेक बैठकीमध्ये सृजनक्‍का सहभागी होती. तिच्यावर नव्यानेच चातगाव व कसनसूर दलमची जबाबदारी आली होती. त्यामुळे तिने आपला प्रभाव दाखवण्यासाठी टीसीओसी सप्ताहाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात मोठा घातपात घडवून आणण्याच्या हेतूने सिनभट्टी जंगल परिसरात नक्षली कॅम्प उभारून व्यहरचना आखली होती. मात्र, पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The informar informed and Police took action against Naxalites