जहाल महिला नक्षली सृजनाक्‍काचा पोलिसांनी केला खात्मा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दरम्यान, शनिवारी (ता. 2) दुपारी साडेतीनदरम्यान नक्षलवाद्यांनी विशेष अभियान पथकाच्या जवानांवर गोळीबार करीत हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जहाल महिला नक्षली सृजनाक्‍का ऊर्फ चिनक्‍का ऊर्फ जैनी चैतू अर्का (वय 48) ठार झाली.

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी जंगल परिसरात झालेलेल्या पोलिस-नक्षल चकमकीत डीव्हीसी कसनसूर दलमची जहाल महिला नक्षलवादी सृजनाक्‍का ऊर्फ चिनक्‍का ऊर्फ जैनी चैतू अर्का (वय 48) हिला पोलिसांनी ठार केले. विशेष म्हणजे, या चकमकीत ठार झालेल्या सृजनाक्‍कावर सरकारने 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

नक्षलवाद्यांचे जंगलात पलायन

 

एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. दरम्यान, शनिवारी (ता. 2) दुपारी साडेतीनदरम्यान नक्षलवाद्यांनी विशेष अभियान पथकाच्या जवानांवर गोळीबार करीत हल्ला केला. त्यानंतर पथकाच्या कमांडोंनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

16 लाखांचे होते बक्षीस

या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता जहाल महिला नक्षलवादी सृजनक्‍काचा मृतदेह मिळाला. सृजनाक्‍का 1988 मध्ये भामरागड दलममध्ये दाखल झाली होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत एकूण 144 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सरकारने तिच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांना या घटनास्थळावरून 1 एके-47 रायफल, प्रेशर कूकर, क्‍लेमोर माइन तसेच मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य मिळाले. प्रेशर कूकर व क्‍लेमोर माइन घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. येथे नक्षलवादी कॅम्प उभारून टीसीओसी सप्ताहाच्या अनुषंगाने देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते.

हेही वाचा : मनाई केल्यानंतरही ती महिला गेली जंगलात...नंतर झाले असे

नक्षलविरोधी अभियान तीव्र

गडचिरोली पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात यश मिळाले आहे. या घटनेनंतर या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या चकमकीतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी- 60 दलाच्या शूर जवानांचे कौतुक करात त्यांना रोख पारितोषिक जाहीर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women naxal killed in police action at gadchiroli