esakal | या गणपतीला आहेत लांब मिश्या आणि दाढी.. भाविकांच्या सर्व इच्छा करतो पूर्ण.. वाचा भृशुंड गणेशाबद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

Information about Vidarbhache Ashtvinayak  Bhrushund ganpati

आपल्या विदर्भातही अष्टविनायक आहेत हे तुमहाला माहिती आहे का?  आम्ही या पुढे तुम्हाला विदर्भातील अष्टविनायकांची माहिती सांगणार आहोत. 

या गणपतीला आहेत लांब मिश्या आणि दाढी.. भाविकांच्या सर्व इच्छा करतो पूर्ण.. वाचा भृशुंड गणेशाबद्दल

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे दर्शन आपल्यापैकी बहुतांश लोकांनी अनेकदा घेतले आहे. त्यांची महिमा ऐकून आणि मनमोहक रूप बघून प्रत्येक जण भारावून जातो. पण आपल्या विदर्भातही अष्टविनायक आहेत हे तुमहाला माहिती आहे का?  आम्ही या पुढे तुम्हाला विदर्भातील अष्टविनायकांची माहिती सांगणार आहोत. 

विदर्भातील अष्टविनायकांमध्ये स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काय आहे इतिहास 

वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधलेल्या या मंदिरात श्रीगणेशाची आठ फुट उंच आणि चार फुट घेराव असलेली सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. इतिहासाच्या नोंदीनुसार येथे श्री चक्रधर स्वामींनी भेट दिली. स्वामींची भेट व मूर्ती स्थापनेचा काळ जवळजवळ एकच असल्याचे जाणवते. त्यावरून ही मूर्ती 1130 मध्ये स्थापन झालेली असावी. गणेशमूर्ती समोर शिवलिंग व नंदीची स्थापना महंत अलोनीबाबा यांनी केली आहे. मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व दु:खाचा ऱ्हास होतो,अशी भाविकांत मान्यता आहे. 

गणेशाचे मनमोहक रूप 

मूर्तीच्या उजव्या बाजूला हेमाडपंती शैलीतील एक दगडी शिवलिंग, शेंदरी रंगाचा नंदी आहे. शिवलिंगावर पितळी कवच लावण्यात आले आहे. श्रींची मूर्ती अखंड शिळेवर कोरली आहे. पूर्ण शेंदूररचित मूर्ती चतुर्भुज असून मुषकावर विराजमान असल्याची नोंद आहे. उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. चारही हातामध्ये पाश, अंकुश, मोदक आणि वरदहस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाच्या जागी नाकपुड्या, डोळे, मिशा, दाढी दिसते. मूर्तीचा चेहरा भव्य आहे. मुखापासून निघालेली सोंड डाव्या हातावरील मोदकाकडे वळण घेतली आहे. कमरेपासून गुडघ्याच्या पातळीवर महावस्त्राचा पदर व मेखला स्पष्ट दिसते. मेंढा या परिसरात गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी होते.

भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश 'मेंढ्‌याचा गणपती' म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्‍या आहेत. महर्षी भृशुंड ऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्‍चर्या केली आणि ते स्वतः:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते.

ऋषींच्या नावानेच ओळख

भंडारा शहराला लाभलेले आध्यामिक वैभव म्हणजे येथील भृशुंड गणेश मंदिर होय. भंडारा शहराला लागून असलेली वस्ती मेंढा या नावाने ओळखली जाते. अत्यंत प्राचीन काळात येथे नागलोकांची वस्ती होती. तेव्हा नागवंशीय भृशुंड ऋषींनी या गणेशाची स्थापना केली. भृशुंड ऋषींनी वैनगंगेच्या काठावर वटवृक्षाखाली तपश्‍चर्या करून या क्षेत्राला पावन केले आहे. गणेश व मुदगल पुराणात भृशुंड गणेशाचे आख्यान दिले आहे. तेव्हापासून या गणेशाचे नावही ऋषींच्या नावावरून भृशुंड असे पडले आहे. 

मेंढा परिसरात गिरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. आजही या भागात हेमाडपंथी शैलीतील स्मारके बघायला मिळतात. या देवस्थानाला आजवर अनेक संत महंतांनी भेटी दिल्या आहेत. श्रृंगेरी पिठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य प. पू. श्री भारतीतीर्थ हे एक होत. बडोद्याचे प. पू. श्री. जनार्दन स्वामी खेर यांनीसुद्धा भृशुंड गणेशाचे दर्शन घेतले आहे. याच मंदिर परिसरात श्री. महावीर हनुमानाची भव्य मूर्ती आहे. परंतु त्यावर मंदिर अथवा कोणतेही छत नाही, हे विशेष.

वर्षभर विविध कार्यक्रम

कित्येक वर्ष हे भृशुंड गणेशाचे मंदिर दुर्लक्षित होते. भंडारा येथील ग्रामजोशी विश्‍वासराव जोशी यांच्या पुढाकाराने 1986 पासून तिथे पूजा सुरू केली गेली. आज मंदिराची भव्यता वाढली असून भव्य सभामंडप व सुंदर परिसर येथे येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक सुख देते.

हे मंदिर परिसरातील ग्रामवासियांच्या पुढाकाराने साकारलेली एक वास्तू असून त्यांच्या सहकार्याने वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रत्येक चतुर्थीला अभिषेक व महापूजा असते. गणेशोत्सवाचा दहा दिवस कार्यक्रम चालतो. पौष संकष्टी चतुर्थी ते माघ चतुर्थीपर्यंत एक महिनाभर अनेक कार्यक्रम असतात. पूजापाठात ग्रामस्थ हिरिरीने सहभागी होऊन कार्यक्रम व उत्सव थाटात पार पाडतात. संस्कारक्षम वातावरण निर्मीतीसाठी ग्रामीण महिलांना गणपती अथर्वशीर्ष शिकविण्यात आले. त्यामुळे आवर्तनाभिषेकात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.

कोरोना संसर्गाचा प्रभाव

चालू वर्षी कोरोना संसर्गामुळे सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साधेपणाने व सामाजिक अंतराचे पालन करून करावयाचे आहेत. त्यामुळे गणेशोत्सवावर सुद्धा कोरोना आजाराचा परिणाम दिसून येत आहे. मेंढा येथील भृशुंड गणेश मंदिरात कमी गर्दी होईल व भाविकांचा त्रास होणार नाही, याकडे देवस्थान समिती लक्ष देत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचाही परिणाम गणेशोत्सवावर दिसत आहे. त्यामुळे यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image