यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली शाई | Yavatmal ZP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली शाई

यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली शाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - जिल्हा परिषद प्रशासन वारंवार स्थायी समितीची सभा तहकूब करते. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत. जिल्हा परिषदेतील एका विभाग प्रमुखांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. हे सगळे रोखण्यासाठीच बोलावण्यात आलेली सभासुद्धा तहकूब करण्यात आल्याने स्थायी समिती सदस्य श्याम जयस्वाल यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या खुर्चीवर शाई फेकून आपला निषेध व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली. मात्र, सभेत केवळ भाजपाचे सदस्य श्याम जयस्वाल व काँग्रेसच्या गटनेत्या स्वाती येंडे उपस्थित होते. सभा सचिवांनी नियमांनुसार अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच सदस्यांची प्रतीक्षा केली. मात्र, वेळेपर्यंत कोणीही सभेत आले नाही.

गुरुवारी बोलाविण्यात आलेली सभा सचिवांनी तहकूब केली. त्यामुळे संतप्त झालेले श्याम जयस्वाल यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात जाऊन त्यांच्या खुर्चीवर शाई फेकली व प्रशासनाकडून वारंवार सभा तहकूब करण्याच्या निर्णयाला विरोध केला. सत्ताधार्‍यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

हेही वाचा: नागपूर : लस नाय तर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाय

एका विभाग प्रमुखांनी चक्क जिल्हा परिषदेत लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले आहे. सत्ताधाऱ्यांना सभेत त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, याची भीती आहे. त्यामुळे ते वारंवार सभा तहकूब करतात, असा आरोप यावेळी सदस्यांनी केला.या प्रकरणी सभा सचिव अरविंद गुडधे यांना विचारले असता, यावर योग्य कारवाई करू अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

सदस्यांना निषेध नोंदविण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, तो त्यांनी सभागृहात नोंदविला असता तर चांगले झाले असते. माझ्या कक्षात येऊन खुर्चीवर शाई फेकली. हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे. सभा तहकूब कोरमअभावी झाली असताना सदस्याने शाई फेकून निंदणीय प्रकार केला आहे. यावर प्रशासनाकडून योग्य भूमिका घेतल्या जाईल.

- कालिंदा पवार, अध्यक्ष, जिल्हा परिषद

प्रशासनाकडून वारंवार सभा तहकुब करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या खुर्चीवर शाई फेकून मी माझा निषेध व्यक्त केला. अध्यक्षांच्या खुर्चीवर शाई फेकताना जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई उडाली असेल तर मी त्याबद्दल जाहीर माफी मागतो. माझा केवळ सत्ताधार्‍यांवर रोष होता. कारण सभा सचिवांना सभा तहकूब करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या सत्ताधार्‍यांचा मी तीव्र निषेध करतो.

- श्याम जयस्वाल, स्थायी समिती सदस्य, जिल्हा परिषद

loading image
go to top