विद्यार्थ्यांच्या नाश्‍त्यात आढळल्या अळ्या, लेंड्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ज्युबिली हायस्कूल येथे तीन दिवसांपासून प्रदर्शन आहे.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे ज्युबिली हायस्कूल येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. या विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळच्या सुमारास देण्यात येणाऱ्या नाश्‍त्यात अळ्या आणि लेंड्या आढळून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिल्या दिवसापासून नाश्‍त्यात अळ्या दिसून आल्या. याबाबत शिक्षण विभागाला सांगण्यात आले. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. 

 

अवश्‍य वाचा- सूर्यग्रहण पाहतायं? ही घ्या काळजी! 

 

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ज्युबिली हायस्कूल येथे तीन दिवसांपासून प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन निवासी स्वरूपाचे आहे. पंधराही तालुक्‍यांतील विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. 23 डिसेंबर रोजी सकाळच्या नाश्‍त्यात एका शिक्षकाला लेंड्या आढळल्या. दुसऱ्या दिवशी नाश्‍त्यात सकाळी उपमा होता. त्यात सिंदेवाही येथील दिव्याणी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्लेटमध्ये अळ्या दिसल्या. बुधवारी (ता. 25) सकाळी उपम्यात अळ्या सापडल्या. याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

अध्यक्षांच्या कानावर टाकला प्रकार 

जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे यांच्या कानावर प्रकार आला. त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यानंतर उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनाही याची माहिती देण्यात आली. त्याची दखल घेण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insects and Insect`s Shit found in the student's breakfast