सूर्यग्रहण पाहतायं? ही घ्या काळजी!

file photo
file photo

गडचिरोली : अवकाशाच्या रंगमंचावर घडणारा हा नयनरम्य सोहळा अर्थात सूर्यग्रहण सुमारे 10 वर्षांनी भारतातून दिसणार आहे. ही खगोल अभ्यासक व हौशी अवकाश निरीक्षकांसाठी पर्वणी असली, तरी सूर्यग्रहण निरीक्षणाचा आनंद लुटताना सुरक्षेची विशेषत: डोळ्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतो, गुरुवारी हा चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला आकाशात सूर्य एखाद्या सुवर्णकंकणासारखा दिसेल. चंद्राची सावली पृथ्वीवरील ठराविक भागातून भ्रमण करेल. त्यावेळी दिवसा अंधार दाटून येईल, पक्षी त्यांच्या घरट्याकडे परतण्याची लगबग करतील, पशू-प्राण्याच्या वर्तनात फरक होईल, झाडांच्या सावल्या बदलतील, या सारखे असंख्य अनुभव तुम्हाला केवळ आणि केवळ सूर्यग्रहण काळातच मिळतील.

सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान सर्वत्र ग्रहण

हे कंकणाकृती सूर्यग्रहण कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यातील काही शहरांमधून दिसणार आहे. महाराष्ट्रासह उर्वरित संपूर्ण भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. सर्वसाधारणपणे सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान सर्वत्र ग्रहण दिसेल. उटी (तमिळनाडू) मधून सूर्याची कंकणाकृती अवस्था 3 मिनिटे 7 सेकंद दिसेल. महाराष्ट्रातून खंडग्रास स्वरूपाचे सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाचा परमोच्च बिंदू सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान असेल.

उत्साहाच्या भरात पाहू नका

उत्साहाच्या भरात उघड्या डोळ्यांनी अथवा असुरक्षित साधनांनी वारंवार सूर्याकडे पाहिल्याने तुमचे डोळे कायमचे अथवा अर्ध-निकामी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सूर्याकडे एरवी देखील पाहणे हानिकारकच असते. मात्र आपण आवर्जून सूर्याकडे पाहत नसल्याने तो धोका नसतो. सूर्यग्रहणाच्या दिवशी मात्र आपण वारंवार सूर्याकडे एकटक पाहतो. सूर्याकडून येणारी अवरक्त (इन्फ्रारेड) व अतिनील (अल्ट्रा व्हॉयलेट) किरणे दृष्टिपटलावर पडून ती कायमची निकामी होण्याची शक्‍यता वाढते.

अंधत्व येण्याचा धोका

सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी, दुर्बीण, कॅमेरा यातून कधीही थेट पाहू नका. काळी काच, काळा गॉगल, एक्‍स रे फिल्म, चंदेरी रंगाच्या ऍल्युमिनिअम फिल्मचे गॉगल यामध्ये सूर्याकडून येणारी हानिकारक अवरक्त व अतिनील प्रारणे शोषली जात नाहीत. ही सर्व साधने खूप स्वस्त असली व त्यातून सूर्य दिसत असला; तरी तात्पुरत्या फायद्यासाठी तुमचे लाखमोलाचे डोळे न गमावण्याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. उष्ण प्रारणामुळे दृष्टिपटलावरील पेशींमधील तापमान वाढते त्यात वाफ तयार होऊन त्या पेशी आतून अक्षरशः भाताप्रमाणे शिजून निघतात. यामुळे कायमचे अंधत्व, कालांतराने गोष्टी धूसर दिसणे, डोळ्यात ब्लाइंड स्पॉट निर्माण होणे, डोळ्यांच्या रंग पाहण्याच्या क्षमतेत फरक पडणे, असे त्रास होऊ शकता.


कसे पाहता येईल?

डोळ्यांना जर एवढा धोका आहे तर ग्रहण पाहायचे नाही का, याचे उत्तर ग्रहण नक्की पाहायचे असे आहे मात्र योग्य काळजी घेऊन सुरक्षित, प्रमाणित साधनांचा वापर करून ही दुर्मिळ घटना आपण अनुभवू शकतो. आयएसओ आंतरराष्ट्रीय मानांकन 12312-2:2015 नुसार बनविलेल्या फिल्टर गॉगलमधूनच सूर्यग्रहण पहावे. सुरक्षित फिल्टरमधून सूर्य नारंगी रंगाचा दिसतो. योग्य काळजी घेऊन या मानांकनाचे फिल्टर दुर्बीण अथवा कॅमेरासमोर लावूनदेखील तुम्ही सूर्यग्रहण पाहू शकता अथवा त्याचे छायाचित्र काढू शकता. फिल्टर न लावता मोबाईल, दुर्बीण, कॅमेरा यातून सूर्याकडे थेट कधीही पाहू नका.


पिनहोल तंत्रज्ञान वापरा

पिनहोल तंत्रज्ञान वापरून तुम्ही सूर्याची प्रतिमा एखाद्या पडद्यावर प्रक्षेपित करून सूर्यग्रहण पाहू शकता. ग्रहणकाळात सच्छिद्र चाळणीमधून तुम्ही सूर्याची ग्रहण अवस्था एखाद्या पांढऱ्या पडद्यावर घेऊ शकता. यासाठी ही चाळणी सूर्यप्रकाशात धरायची व त्याची सावली पाहायची. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 26 डिसेंबर रोजी आकाश ढगाळ असेल तरीही सूर्यबिंब उघड्या डोळ्यांनी पाहू नका, असेही तज्ज्ञांनी सुचविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com