आर्वीत राष्ट्रध्वजाचा अपमान; पोलिसात तक्रार 

राजेश सोळंकी 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

प्रकरणाची तक्रार नागरिक व पर्यावरण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी आर्वी पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस ताफा उपस्थित झाला. पोलिस व नागरिकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले.

आर्वी - येथील रियाज अहमद उर्दू मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व शाळेतील शिक्षकांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना बुधवारी ता. 15 सकाळी 7 वाजता घडली. या प्रकरणाची तक्रार नागरिक व पर्यावरण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी आर्वी पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस ताफा उपस्थित झाला. पोलिस व नागरिकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले.

या शाळेत राष्ट्रीय तिरंगा ध्वज सकाळी 7 वाजता फडकविण्यात आला. मात्र राष्ट्रीय ध्वजाचा तसेच संहितेचा भंग करण्यात आला. प्रथम ध्वजदंड आडवा पडून त्याला राष्ट्रीय ध्वज बांधतांना नागरिकांना आढळले असता नागरिकांनी असे करण्यास मज्जाव केला. मात्र शाळेतील कर्मचाऱ्यांनी उर्मटपणाचे उत्तर देऊन राष्ट्रध्वजाचे पावित्र्य न राखता धाव ध्वज आडवा फडकविला. ध्वज दंड लोखंडी दाराला बांधला व न फडकविताच राष्ट्रगीत न म्हणताच शाळेतील सर्व निघून गेले. या घटनेची माहिती उपस्थित नागरिकांनी पोलिसांना दिली. त्याठिकाणी पोलिस व नागरिकांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुन्हा ध्वजारोहण करण्यात आले. 

या घटनेची माहीती आर्वीत सगळीकडे पसरली तेथे नागरिकांनी तोबा गर्दी केली. भारतीय संविधान राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा अपमान करून मूलभूत कर्तव्याचाही अपमान करण्यात आल्याने या घटनेची अनेक नागरिकांनी लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अनेक नागरिकांच्या त्यावर स्वाक्षरी आहे. 
यासंदर्भात या शाळेतील नायाब नियाज या कर्मचारीला विचारणा केली असता, 'आमची शाळा किरायाने आहे. चार हजार रुपये भाडे आहे. या जागेच्या मालकाने सोमवारी ता. 13 किराया न दिल्याने शाळेच्या गेटला कुलूप लावले. आम्ही त्यांना आज स्वातंत्र्य दिन आहे. कुलूप उघडून द्या,' अशी विनंती केली. पण त्यांनी कुलूप उघडले नाही. म्हणून आम्ही बाहेर दारावरच झेंडावंदन केल्याची कबुली दिली. 

 

Web Title: Insult of National Flag Complaint in the police