मेटिखेडा येथील शेतकरी सुविधा केंद्रात कृषी उपसंचालकांचा हस्तक्षेप, केली युरियाची अवास्तव मागणी

सूरज पाटील
Saturday, 19 September 2020

मागील दोन महिन्यांपासून पांढरकवडा येथील कृषी उपसंचालक जगन राठोड यांचा दैनंदिन कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यांच्याकडून अवास्तव युरिया खताची मागणी केली जात आहे.

यवतमाळ : शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या मेटिखेडा येथील कास्तकार शेतकरी सुविधा केंद्रात कृषी उपसंचालकांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. अवास्तव युरियाची मागणी त्यांच्याकडून केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. न्याय मागणीसाठी शुक्रवारी (ता.18) जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कास्तकार सुविधा केंद्र मेटिखेडा येथे सुरू केले आहे. परिसरातील तीस ते चाळीस गावांतील शेतकऱ्यांना या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. अभ्यास दौरा, शेतीविषयक कार्यशाळा, प्रशिक्षण, शिबिर, शिवार फेरी, कास्तकार अभ्यासगट अशा माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहोचविण्यात आल्या.

यंत्रणेवर आणला दबाव

मागील दोन महिन्यांपासून पांढरकवडा येथील कृषी उपसंचालक जगन राठोड यांचा दैनंदिन कारभारात हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यांच्याकडून अवास्तव युरिया खताची मागणी केली जात आहे. मागणी पूर्ण करण्यात न आल्याने स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आदिवासी सोसायटीचे गोदाम भाडेकराराने मिळू नये, यासाठी त्यांनी यंत्रणेवर दबाव आणल्याचा उल्लेख निवेदनात आहे.

हस्तक्षेपाची दखल घ्या

युरिया टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना २६६ रुपये या भावामध्ये उपलब्ध करून दिला. त्यामुळे वाढत्या हस्तक्षेपाची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन देतेवेळी मेटिखेडा येथील सरपंच राधेश्‍याम जयस्वाल, विजय पाटील, नरेंद्र जयस्वाल, प्रहारचे पिंटू दांडगे, भीमराव नंदुरकर, महेश कचरे, संजय देवतळे, प्रफुल कुळसंगे, हेमंत गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जाणून घ्या : यशोगाथा... खादी कापडनिर्मितीतून महिला झाल्या स्वयंपूर्ण, कुणी साधली ही किमया

बाजारातील शोषण थांबविण्यासाठी पर्याय

गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाची बियाणे, खते, औषधी, स्वस्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होत आहे. कास्तकार सुविधा केंद्र ही सामूहिक चळचळ आहे. बाजार व्यवस्थेत होणारे शोषण थांबविण्यासाठी पर्याय समोर येत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intervention of Deputy Director of Agriculture at Farmers Facilitation Center at Metikheda