‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या डॉ. शीतल आमटे, वाचा सविस्तर...

स्वाती हुद्दार
Monday, 30 November 2020

तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत...

नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत...

सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण माझ्या वाट्याला आलं होतं. आनंदवनातला आनंद घेऊन. सोबतीला होते बाबा, आजी, आई-बाबा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझा सांभाळ करणाऱ्या सुशी आजी आणि मिनी आजी. जन्मत:च माझे पाय वाकडे होते. त्यामुळे अगदी माझ्या आठवणीत आहे, तेव्हापासून डॉक्‍टर, औषधं आणि पायाला बांधलेलं प्लॅस्टर हे माझे सोबतीच. माझ्या पायांमुळे आईला सतत मला कडेवर घ्यावं लागायचं. परिणामी तिला कंबरेचं दुखणं जडलं आणि तिनं अंथरुण धरलं. त्यामुळे सुशी आजी आणि मिनी आजीनीच पुढे मला सांभाळलं. मला चित्र काढायला शिकवलं. विणकाम, भरतकाम शिकवलं. आणि ते सगळं मला मनापासून आवडत गेलं.

जाणून घ्या - नागपुरात दिवसा थरार : वाहतूक पोलिस कर्मचारी बोनेटवर आणि कार सुसाट

त्याशिवाय मला अभ्यास करायला खूप मनापासून आवडायचं. अभ्यास म्हणजे मला करमणुकच वाटायची. माझ्या आजुबाजुला स्वस्थ समाजानं झिडकारलेली माणसंच होती. ती माणसं, त्यांची मुलं हेच माझे सवंगडी होते. शरीरानं अव्यंग असलेल्या समाजानं मात्र मला नेहमीच दूर ठेवलं. शाळेत सुद्धा इतर मुली किंवा त्यांचे पालक मला ठरावीक अंतरावरच ठेवत असतं. कारण ही मुलगी महारोगी कॉलनीतून येते, त्यामुळे हिच्यापासून दोन हात दूर राहिलेलंच बरं. अशीच वागणुक मला मिळत होती. त्यामुळे मी दिव्यांग व्यक्‍तींमध्येच रमत गेले. तेच मला आपलेसे वाटत. या आठवणी सांगितल्या महारोग सेवा समितीच्या चिफ एक्‍झिक्‍युटिव्ह ऑफिसर असलेल्या डॉ. शीतल आमटे यांनी.

गेल्या तीन पिढ्यांपासून समाजसेवेचं व्रत सांभाळणारं आमटे कुटुंब. समाजानं नाकारलेल्या महारोग्यांना त्यांनी माणूसपण बहाल केलं. अन्न-वस्त्र-निवारा आणि सन्मानाचं जिणं देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटेंची ही नात आणि डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटेंची कन्या. आजोबांनी वारश्‍यात दिलेली समाजसेवेची पालखी खांद्यावर आनंदाने वाहाते आहे.

हेही वाचा - महिलेचा पंटरशी संवाद; ‘अजून प्रसूती झालेली नाही, तुम्हाला बाळ देऊ शकत नाही’

आनंदवनचे कार्य नव्या काळाला अनुसरून अधिक विस्तारताना त्याला नवनवीन आयाम देण्यासाठी आणि विविध प्रोजेक्‍ट राबविण्यासाठी सतत धडपडणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याविषयी त्यांना बोलतं केलं असता त्यांनी त्यांच्या आठवणींची रेशमी पुरचुंडीच रिती केली. त्यातून अनेक मखमली आठवणी समोर आल्या. त्या सकाळच्या वाचकांसाठी.

त्या म्हणाल्या माझ्या आजोबांचं जगावेगळं उत्तुंग कार्य पाहातच मी मोठी होत गेले. मी चवथीत असताना बाबा नर्मदा परिक्रमेसाठी गेले. तोपर्यंत त्यांचा सहवास मिळाला. त्यानंतर मात्र माझं मेडिकलचं शिक्षण आटोपल्यावरचं ते परत आले. मात्र ते नव्हते, तेव्हा त्यांची पत्र यायची आणि तो माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होता. 1999 साली आलेल्या एका पत्रात बाबांनी लिहिलं होतं, तूच माझ्या घराण्याची भाग्यरेषा आहेस. बाबांच्या त्या पत्रांनी वाढत्या वयात माझ्या मनावर सखोल परिणाम केला. आजी मात्र सतत सोबत होती. तिच्या हातच्या साय-दहीभाताची चव जगातल्या दुसऱ्या कुठल्याच पदार्थाला नाही.
बाबांच्या माघारी आनंदवनच्या कामाचा सगळा भार माझ्या वडिलांच्या खांद्यावर होता. त्यांचं माझं नातं लहानपणापासून वडिल-मुलीपेक्षा मैत्रीचं अधिक आहे. त्यांना मी अरे दादा म्हणते आजही. आम्ही खूप बोलतो. भांडतो.

सविस्तर वाचा - मध्यरात्रीचा थरार : चालत्या ट्रॅव्हल्समध्ये स्फोट; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घटना

एकमेकांवर रागवतोही. लहानपणी दादाला काम आटोपून घरी यायला रात्रीचा एक वाजायचा. मी त्याची वाट पाहात जागी असायचे. तो आला की आम्ही खूप गप्पा मारायचो. चित्र रंगवायचो. मग मी झोपायचे. कधी आम्ही झाडाच्या नावाच्या भेंड्या खेळायचो. दादाविषयीची ती ओढ आजही तशीच आहे. तो आजही कोणाचं ऐकत असेल, तर केवळ माझंचं.

अभ्यासात मी लहानपणापासूनच ठिक होते. मात्र मला कलेविषयी आसक्‍ती होती. त्यामुळे पुढे कलाक्षेत्रात करिअर करायचं, असं ठरवलं होतं. पण 12 वी मध्ये 98 टक्‍के मार्क्‍स मिळाले. राणी मावशी बंग म्हणाली, की तू डॉक्‍टर हो. डॉक्‍टर झाल्यावरही पुढे तुला कला क्षेत्रातही काही करता येईल, मात्र एकदा कलाक्षेत्र निवडलसं की मग डॉक्‍टरी करता येणार नाही. सगळ्यांचा आग्रह आणि विशेषत: बाबांची इच्छा म्हणून मी मेडिकलला ऍडमिशन घेतली. पुढे आमचे एक सर एकदा मला म्हणाले, मानवाचं शरीर एक कलाकृती आहे. त्यानंतर मी शरीरशास्त्राच्या अभ्यासाकडे कला म्हणून बघू लागले आणि आश्‍चर्य म्हणजे मला ते शिक्षण आवडू लागलं.

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

मी एमबीबीएस झाले तेव्हा बाबा आनंदवनात परत आले होते म्हणून मी एमडी किंवा एमएस न करता त्यांच्या सहवासात आनंदवनातच थांबण्याचा निर्णय घेतला आणि मला आयुष्यभर पुरून उरेल इतका त्यांच्या सहवासाचा आनंद मिळाला. या काळात मी अनेक कोर्सेस केले. पदव्या घेतल्या. यवतमाळ जिल्ह्यात दादाबरोबर शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी काम केलं. माझं कलेवरचं प्रेम बघून अनिल अवचटांनी मला कॅमेरा दिला. आणि अभयकाकानं (डॉ. अभय बंग) मला फोटोग्राफी शिकवली. माझं पहिलं मॉडेल बाबा होते. पुढे मी फोटोग्राफीच्या माध्यमातून आनंदवनचं बरचं डॉक्‍युमेंटेंशन केलं. माझ्या छायाचित्रांना अनेक बक्षीसंही मिळाली.

२००७ साली गौतम माझ्या आयुष्यात आला. तीन-चार महिन्यांच्या मैत्रीनंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. आणि आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. गौतमच्या रुपानं मला जिवाभावाचा सखा मिळाला. गौतमचं पोस्टींग तेव्हा श्रीलंकेला होतं. तिथं सेव्हनस्टार लाईफस्टाईल होती, सगळी सुखं हात जोडून उभी होती. मात्र मला तिथे निरुद्देश जगणं नकोसं वाटू लागलं. शेवटी माझ्यासाठी गौतमनंही आनंदवनला येण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही आनंदवनला स्मार्टव्हिलेज बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. पुढे आमच्या लेकाचा जन्म झाला. त्यानं माझं आईपण घडवलं आणि माझं आयुष्य परिपूर्ण झालं. त्यानं माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली.

अधिक वाचा - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

आधी मी खूप परफेक्‍शनिस्ट होते. एखादी गोष्ट करायची तर ती परफेक्‍टच असायला हवी, ही माझी फिलॉसॉफी होती, आता माझ्या लेकामुळे मी प्रोसेस एन्जॉय करायला शिकले. त्याच्याचमुळे आम्ही वृक्षारोपण सुरू केलं. त्याच्याचमुळे मी परत पेंटिंग करायला लागले. इथे आनंदवनात आमचं अडीच हजार घरांचं कुटुंब आहे. आणि आम्ही इथे आई मॉडेल राबवितो. म्हणजे एवढ्या सगळ्यांना सांभाळून घ्यायला आईसारखं क्षमाशील असावं लागतं. त्याला आम्ही मदर्स ऍपरोच म्हणतो.

आनंदवनात खरचं खूप आनंद आहे. इथलं जीवन अर्थपूर्ण आहे. माझा आणि गौतमचा विक पॉईंट म्हणजे आमचा कुत्रा. त्याच्याशी खेळंण हे आमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. इथल्या कामानं आम्हाला खूप समाधान मिळतं. आणि त्या कामाची खूप गरजही आहे. बाबांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे,
पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्‍तगंगा, द्या इथे मातीत वाहू
नांगरू स्वप्ने उद्याची, गर्द ही फुलतील शेते
घाम गाळील ज्ञान येथे, येथुनी उठतील नेते
ह्याचसाठी वाहिली ही सर्व निधळाची कमाई
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interview with Sheetal Amte read full story