
कुमार चिंता यांच्या कामाचा साधासोपा फार्म्यूला आहे. देशसेवेकरिता त्यांनी सहायक आयुक्तपदाच्या नोकरीचा त्याग करून आयपीएस अधिकारी पद स्वीकारले. दरम्यान दत्तापूर पोलिस ठाण्यात रुजू होताच त्यांनी आपली कर्तव्यपरायणता सिद्ध केली व कोरोनाविषयी धामणगावकरांची चिंता दूर केली.
धामणगावरेल्वे (अमरावती) : धाडसी अधिकारी म्हणून कुमार चिंता यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. कसलीही भीड न ठेवता काम करणारा हा जगावेगळा माणूस. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं, हा कुमार चिंता यांच्या कामाचा साधासोपा फार्म्यूला आहे. देशसेवेकरिता त्यांनी सहायक आयुक्तपदाच्या नोकरीचा त्याग करून आयपीएस अधिकारी पद स्वीकारले. दरम्यान दत्तापूर पोलिस ठाण्यात रुजू होताच त्यांनी आपली कर्तव्यपरायणता सिद्ध केली व कोरोनाविषयी धामणगावकरांची चिंता दूर केली.
तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यात पोतीरड्डी नावाचे गाव. शेतकरी कुटुंबात कुमार चिंता यांचा जन्म झाला. कुमार चिंता आणि त्यांचे बंधू सुमन यांनी आपल्या लहानशा खेडेगावात चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर हुजुराबाद या तालुक्याच्या ठिकाणी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना दररोज 20 किलोमीटर सायकलने प्रवास करावा लागत असे. घरच्या संस्कारामुळे कुमार चिंता यांना प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. घरी अवघी तीन एकर शेती. या शेतात त्यांचे वडील रामलू व आई शामला राबायचे. कुमार चिंता यांनी काबाडकष्ट करीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद गाठले. अनेक वेळा त्यांना अगदी उपाशीही गुजराण करावी लागे. बारावी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 2010 मध्ये अभियांत्रिकीत पदवी प्राप्त केली. यापुढे यशाच्या दिशेने कुमार चिंता यांचा प्रवास सुरू झाला. युपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात कुमार चिंता परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी राजकोट येथे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अंतर्गत सहायक आयुक्त या पदावर दोन वर्षे सेवा बजावली. परंतु त्यांचा आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा मानस होता. 2016 ची युपीएससी परीक्षा ते उत्तीर्ण झाले. हैदराबाद येथे सलग दोन वर्षे प्रशिक्षण झाल्यानंतर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी म्हणून अमरावती येथे ग्रामीण पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून दत्तापूर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी आई, वडील, भाऊ, पत्नी दिव्या यांची मोलाची साथ मिळाली. त्यांना ध्रुव अयान नावाचा मुलगा आहे.
सविस्तर वाचा - टाळेबंदीत गृहिणींसाठी आली ही आनंदाची बातमी
धामणगावात दिली सेवा
दत्तापूर ठाण्याचे ठाणेदार व परिविक्षाधीन आय. पी. एस. अधिकारी कुमार चिंता 16 फेब्रुवारीला दत्तापूर ठाण्यात रुजू झाले होते. त्यांनी जवळपास तीन महिने याठिकाणी कर्तव्य बजावून पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.