मनरेगाच्या कामात केला घोळ; कारवाईच्या भीतीने रोजगार सेवकांची पळापळ 

MNREGA
MNREGA

कारंजा (जि. वर्धा) : कारंजा तालुक्‍यात मनरेगाच्या कामात घोळ झाल्याचे उघड झाले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये चौकशी सुरू झाली आहे. घोळ असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांसह रोजगार सेवकही कारवाईच्या घेऱ्यात आले आहेत. या उद्‌भवलेल्या स्थितीमुळे रोजगार सेवकांनी कामापासून पळ काढल्याचे पुढे येत आहे. 

ग्रामीण भागात विकास साधण्यासह रोजगाराची हमी देत महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित झाली. या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवकाला मदत म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसभेतून रोजगार सेवकांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक ग्रामपंचायतने या योजनेतून विकासकामे केली. मात्र, कारंजा पंचायत समिती अंतर्गत किन्हाळा ग्रामपंचायतीमध्ये पांदण रस्त्याचा गौडबंगाल ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून उघडकीस आणला होता. त्यामुळे या प्रकरणात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण सध्या चौकशीत आहे. या प्रकरणावरून रोजगार सेवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड ओढवली जाणार असल्याने इतर ग्रामपंचायतमधील रोजगार सेवकांची घाबरगुंडी उडाली आहे. 

यामुळे अनेक ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवकांनी ग्रामपंचायतीकडे राजीनामा सोपविला. मात्र, त्यांचा राजीनामा ग्रामपंचायत स्तरावरून मंजूर न केल्याने कोणतेही रोजगार सेवक रोजगार हमीच्या कामावर जात नसल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी रोजगार हमीमधून फळबाग लागवड, सिंचन विहीर, खचलेल्या, बुजलेल्या विहिरी, पांदण रस्ते, नाला सरळीकरण, शौचालय बांधकाम, शोषखड्‌डे, विहीर पुनर्भरण, घरकुल बांधकाम, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड यांसह इतर कामे या योजनेतून करावी लागतात.

 
तालुक्‍यात ५९ ग्रामपंचायती

पंचायत समितीच्या अंतर्गत ५९ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येकी ग्रामपंचायत स्तरावर रोजगार सेवक आहेत. पण, सध्या त्यांच्यात धाकधूक वाढल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेक रोजगार सेवक ‘रोजगार हमी योजनेचे काम नको रे बाबा’ असे म्हणत आहे. तर काही ग्रामपंचायतींमध्ये जुने रोजगार सेवक कामे करीत नसून गावाचा विकास खुंटला आहे. काही ठिकाणी नव्याने रोजगार सेवकांची निवड केली आहे. मात्र, ज्या रोजगार सेवकांनी या योजनेतून पळापळ केली. त्यांचे या घोळात हात ओले असल्याची चर्चा तालुक्‍यात जोरात आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com