esakal | साकोलीत कोट्यवधी रुपयांचा सिंचन प्रकल्प झाला तयार...परंतु शेतीला सिंचनच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

साकोली : कुंभली येथील चुलबंद प्रकल्प.

निम्न चुलबंद प्रकल्प सिंचनासाठी तयार केला आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी प्रकल्पाचे दार उघडणे, बंद करणे तसेच पंपहाउसमध्ये ऑपरेटिंग करण्यासाठी विभागाकडून कुशल कर्मचारी उपलब्ध करून दिलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. काही ठिकाणी कालव्यात झुडूप वाढले आहेत. प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले तर, शेतीला सिंचन होण्याऐवजी पाण्याचा अपव्यय होण्याची शक्‍यता आहे.

साकोलीत कोट्यवधी रुपयांचा सिंचन प्रकल्प झाला तयार...परंतु शेतीला सिंचनच नाही

sakal_logo
By
मनीषा काशिवार

साकोली (जि. भंडारा) : तालुक्‍यातील कुंभली येथे कोट्यवधी रुपये खर्च करून निम्न चुलबंध प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे बॅरेज व पंपहाउसचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु, ऑपरेटिंगसाठी कर्मचारी नियुक्त केलेच नाही. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना प्रकल्पातून सिंचनाचा फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा प्रकल्प कोणत्या कामाचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

निम्न चुलबंद प्रकल्प सिंचनासाठी तयार केला आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी सोडण्यासाठी प्रकल्पाचे दार उघडणे, बंद करणे तसेच पंपहाउसमध्ये ऑपरेटिंग करण्यासाठी विभागाकडून कुशल कर्मचारी उपलब्ध करून दिलेच नाही. प्रकल्पाच्या पंपहाउसवर किमान चार ऑपरेटरची आवश्‍यकता आहे. परंतु, सध्या येथे एकही ऑपरेटर नाही.

यामुळे पंपहाउसमधील यंत्रे हाताळणी व सिंचनाचे पाणी सोडण्याची जबाबदारी कोणीच पेलू शकत नाही. विभागाचे अधिकारी सामान्य कर्मचाऱ्यांकडूनच तांत्रिक स्वरूपाची कामे करवून घेत आहेत. त्यामुळे तांत्रिक कामाबाबत एखादा मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

चौकीदारसुद्धा नियुक्त नाही

या प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी चौकीदारसुद्धा नियुक्त केलेला नाही. 15 दिवसांपूर्वीच या प्रकल्पाच्या यंत्रसामुग्रीतून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या सामानाची चोरी झाली आहे. सध्या प्रकल्पाचे कोट्यवधी रुपयांचे अवजड साहित्य व यंत्रसामग्री असुरक्षित आहेत.

पाण्याचा अपव्यय होण्याची शक्‍यता

हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. बऱ्याच काळापर्यंत निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात पडून होते. नंतर निधीच्या उपलब्धतेनुसार कामे पूर्ण करण्यात आली. परंतु, कालवे, वितरिका, गेट, पंप यापैकी जुने झालेल्या कामांची देखरेख करणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी कालव्यात झुडूप वाढले आहेत. त्यामुळे प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले तर, शेताला सिंचन होण्याऐवजी पाण्याचा अपव्यय होण्याची शक्‍यता आहे.

जाणून घ्या : हे तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान...कीड नियंत्रणासाठी लावले यंत्र

नागपूरला जाऊन तक्रार करा

प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्याने आता मध्यम प्रकल्प उपविभाग साकोली या कार्यालयाकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. सध्या हे कार्यालय नागपूर पाटबंधारे मंडळ या कार्यालयास संलग्नित आहे. त्यामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय मिळते. त्यांना कुठली तक्रार करायची असल्यास नागपूर पाटबंधारे मंडळाला करावी लागते. सध्या कोरोना संकटाच्या काळात 100 किलोमीटरवर जाऊन शेतकरी तक्रार करू शकत नाही. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी प्रकल्पाचे कामकाज अंबाडी (भंडारा) येथील मंडळ कार्यालयास संलग्नित करण्याची गरज आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)