सुट्यांमुळे अडली ग्रामीण भागात मंडईची परवानगी, कोरोना संकटामुळे गावकऱ्यांत संभ्रम

file photo
file photo

भंडारा : देशभरात कोरोना संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात आले. आता दिवाळीनंतर झाडीपट्टीतील मंडई व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. मात्र, तीन दिवसांच्या सुट्यांमुळे अद्याप तालुका प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही. यामुळे मंडईचे आयोजन करण्याबाबत गावकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे काही ठिकाणी दिवस मंडई भरणार असून, रात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

देशात मार्च महिन्यापासून कोरोना संकट उद्‌भवले आहे. यामुळे पहिले तीन महिने सर्वजिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाउनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूशिवाय सर्व उद्योगधंदे व वाहतुकीची साधने बंद करण्यात आली होती. परजिल्ह्यातून व महानगरातून येणाऱ्यांना विलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. सप्टेंबर महिन्यापासून काही प्रमाणात सुटी देण्यात आली. मात्र, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, संमेलनांवर बंदी कायम होती. धार्मिक ठिकाणेसुद्धा बंदच होते.

दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम व बॅंडपार्टीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे इतर सण साधेपणाने साजरे केले असले; तरी दिवाळीनंतर झाडीतील सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साह वाढण्याची शक्‍यता होती. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापासून मंडईला सुरुवात होणार असल्याने ग्रामीण भागातील पदाधिकारी व उत्साही नागरिक तहसीलदार व जवळच्या पोलिस ठाण्यात परवानगी मिळण्यासाठी अर्ज देत आहेत.

जाणून घ्या : आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

मात्र, सतत चार दिवसांच्या सुट्या आल्यामुळे शासकीय कार्यालयातील कामे शुक्रवारपासून अडली आहेत. पोलिस ठाण्यातून कार्यक्रमासाठी परवानगी मिळू शकत नाही. त्यामुळे कार्यक्रम घ्यावा किंवा नाही, अशी अवस्था आयोजकांची झाली आहे. काहींनी आठवड्यापूर्वीपासून परवानगीसाठी अर्ज देऊनही त्याला तहसील कार्यालयातून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आयोजकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

काही गावांत दुपारची मंडई

काही गावांत रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, दुपारी मंडई व दंडारीचा कार्यक्रम होणार आहे. कोरोना आजाराची लागण होण्याची भीती असल्यामुळे बाहेरगावी मंडईसाठी जावे किंवा नाही? असा प्रश्‍न नातेवाइकांच्या मनात निर्माण झाला आहे. मोहाडी तालुक्‍यातील करडी येथे परवानगी न मिळाल्यामुळे मंडईचे आयोजन रद्द केले आहे. त्याचप्रमाणे परवानगी मिळत नसल्याने निलज, मुंढरी, जांभोरा, पालोरा, खडकी, बोरगाव, केसलवाडा, ढिवरवाडा या गावात मंडईबाबत संभ्रमावस्था आहे. याबाबत मोहाडीचे तहसीलदार बोंबर्डे यांनी मंगळवारी कार्यालयातून परवानगी मिळेल, असे सांगितले आहे. तुमसर तालुक्‍यात वाहनी येथे सोमवारी फक्त जत्रा भरणार आहे. लाखनी तालुक्‍यात मंगळवारी मंडई भरणार असली तरी, सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत अनिश्‍चितता आहे. या सर्व गावांत कार्यक्रमासाठी मंगळवारनंतरच परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे.

निष्काळजीपणा अंगावर येणार

जिल्ह्यात अजूनही कोरोना आजाराचे रुग्ण दररोज आढळत आहेत. दिवाळीच्या उत्साहात त्याकडे दुर्लक्ष करून भरगच्च गर्दीचे कार्यक्रमांचे आयोजन केल्यास त्यामुळे आजाराचे संक्रमण अचानक वाढू शकते. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागू शकतो. दिवाळीच्या सुट्यांनंतर सुरू होणाऱ्या शाळा-महाविद्यालये व इतर क्षेत्रातही कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. तेव्हा मंडई व सांस्कृतिक कार्यक्रमातही मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्‍यक आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com