जंगलात घात लावून केले त्याने महिनाभरात तिघांवर जीवघेणे हल्ले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

आष्टा येथील शीलाबाई गोपाल गुरनुले ही महिला गावातील लोकांसोबत सकाळी तेंदूपाने संकलनासाठी रवी-अरसोडा जंगल परिसरातील कक्ष क्र. 67 मध्ये गेली होती. तेंदूपाने तोडत असताना झुडपात लपून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला.

गडचिरोली : तेंदूपाने संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना रवी -अरसोडा जंगल परिसरातील कक्ष क्र. 67 मध्ये शुक्रवारी (ता. 8) सकाळी घडली. तसेच दुसरी घटना आरमोरी तालुक्‍यातील आरमोरी- वडसा मार्गावर कोंढाळा जंगल परिसरात शनिवारी (ता. 9) सकाळी घडली. या घटनेत वाघाने जंगलात तेंदूपाने गोळा करायला गेलेल्या इसमावर हल्ला करून त्याला ठार केले. 

हल्ला करून केले महिलेला जखमी

वनविभागाच्या वतीने शुक्रवारपासून तेंदूपाने संकलन केंद्र सुरू करण्यात आल्याने अनेक महिला, पुरुष जंगलात सकाळी तेंदूपाने संकलनासाठी गेले होते. वनविभागाने वाघाचा वावर असलेल्या क्षेत्रात वनकर्मचाऱ्यासोबत गावातील काही युवकांची मदत घेऊन पहाराही दिला होता. आष्टा येथील शीलाबाई गोपाल गुरनुले ही महिला गावातील लोकांसोबत सकाळी तेंदूपाने संकलनासाठी रवी-अरसोडा जंगल परिसरातील कक्ष क्र. 67 मध्ये गेली होती. तेंदूपाने तोडत असताना झुडपात लपून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. वाघाने हल्ला करताच शीलाबाईने आरडा-ओरड केल्यामुळे तिच्या शेजारी व सभोवताल असलेल्या लोकांनीही आरडाओरड करून मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे शीलाबाईचा जीव वाचला व वाघ जंगलात पळून गेला. 

अवश्य वाचा-  हे तर मरणाला आमंत्रण, कोरोना काळात घरपोच दारू नकोच!

घटनेची माहिती मिळताच आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचारासाठी दाखल केले. या महिलेला वाघाने पंजे मारल्यामुळे जखमी होऊन दुखापत झाली. रवी-अरसोडा जंगल परिसरात वाघाचा वावर असून महिनाभरापूर्वी याच जंगलात वाघाने आरमोरी येथील एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केले होते. आता ही दुसरी घटना घडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून केली आहे. 

वाघाने केले ग्रामस्थाला ठार 

आरमोरी : जंगलात तेंदूपाने गोळा करायला गेलेल्या ग्रामस्थावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना आरमोरी-वडसा मार्गावर कोंढाळा जंगल परिसरात शनिवारी (ता. 9) सकाळी घडली. अभिमन्यू नारायण झिलपे (रा. कोंढाळा वडसा) असे मृताचे नाव आहे. शनिवारी कोंढाळा गावातील काही नागरिक तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. येथे वाघाचा वावर असल्याने या परिसरात गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना धोक्‍याचा इशारा देत परत जाण्यास सांगितले. पण परतणाऱ्या नागरिकांमध्ये अभिमन्यू झिलपे नव्हता. त्यामुळे जंगलात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावरील जखमांमुळे तो वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. अभिमन्यू झिलपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. सध्या वडसा वनविभागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या असून आतापर्यंत वाघाने तिघांना ठार केले आहे, तर एक महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It`s difficult to collect Tendu. Tiger attacked two peoples