गरजू गर्भवतींना मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नागपूर - जीवनाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असल्यामुळे जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे नागपुरातील अकरा गरजू गर्भवतींना "वात्सल्यम' उपक्रमात मायेची ऊब दिली आहे. या गर्भवतींची तपासणी, चाचण्या आणि औषधोपचाराचा भार या संस्थेने उचलला आहे.

नागपूर - जीवनाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असल्यामुळे जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे नागपुरातील अकरा गरजू गर्भवतींना "वात्सल्यम' उपक्रमात मायेची ऊब दिली आहे. या गर्भवतींची तपासणी, चाचण्या आणि औषधोपचाराचा भार या संस्थेने उचलला आहे.

या उपक्रमात रविवारी गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम पार पडला. गर्भाचे पोषण तसेच योग्य वाढीसाठी आवश्‍यक असलेली औषधे आणि पूरक आहाराचे यावेळी वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले. गर्भाच्या योग्य वाढीसाठी औषधे आणि पूरक आहाराची आवश्‍यकता का आहे त्याचप्रमाणे या काळात त्यांचा आहार-विहार कसा असावा याबाबत डॉ. रिता पराशर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शंकांचे निरसनही केले.

श्रीवत्स ज्योतिष विद्यालय आणि जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे या उपक्रमासाठी नागपूरच्या विविध भागांतील अकरा गर्भवतींची आवश्‍यक सर्व मदतीसाठी निवड केली आहे. आर्थिक परिस्थिती बघून या गरजूंची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या सर्व गर्भवतींची नियमित तपासणी डॉ. स्मिता चतुर्वेदी यांच्याकडे होत असून आवश्‍यक त्या तपासण्या मोफत केल्या जात आहेत. या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून सौ. नमिता पारखी यांच्याकडे जबाबदारी आहे. एकत्रीकरण कार्यक्रमाला विद्यालयाचे संस्थापक प्रबोध वेखंडे आणि त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.

वात्सल्यम या उपक्रमात गरजू गर्भवतींना आवश्‍यक ती सर्व मदत केली जात आहे. अशाच प्रकारची मदत यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस आहे.
- प्रबोध वेखंडे, श्रीवत्स ज्योतिष्य विद्यालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jangoraitada tribal organization activities