जयश्रींनी सावरले शेकडो महिलांचे संसार

सुषमा सावरकर
Saturday, 14 September 2019

नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या सक्षम झाल्या आणि आता महिला सक्षमीकरणाच्या कार्यात मोलाची भूमिका पार पाडत आहेत.

नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या सक्षम झाल्या आणि आता महिला सक्षमीकरणाच्या कार्यात मोलाची भूमिका पार पाडत आहेत.
ही कहाणी आहे जयश्री नरेंद्र गोतमारे यांची. जयश्री समुपदेशक आहेत. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. 2003मध्ये लग्न करून त्या सासरी आल्या. माहेर काटोल तालुक्‍यातील ईसापूर, तर सासर नागपूरचे. पती शेतकरी. शेतकऱ्याच्या घरात असतात, त्या सर्व समस्या आ-वासून उभ्या होत्या. या अडचणींचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वातावरणाचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी जयश्रींची धडपड सुरू होती. मात्र, दुसरा मुलगा झाल्यावर त्यांनी ठरवलं की आता यापुढे स्वस्थ न बसता कार्य करायचं.
कला क्षेत्रातील पदवी आणि समुपदेशकाची पदविका होतीच. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. एका सामाजिक संस्थेत अतिशय कमी मानधनावर नोकरी पत्करली. "एमएसडब्ल्यू' पूर्ण केले. कळमेश्‍वर येथील महिला समुपदेशन केंद्रात मानधन तत्त्वावर काम मिळाले.
समुपदेशक म्हणून त्यांनी एक हजाराहून जास्त प्रकरणे हाताळली. तर, तब्बल 70 टक्के कुटुंबांचे संसार विभक्त होण्यापासून वाचविले. महिलांच्या अनेक समस्यांमागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणे, हे होय, हे त्यांनी ओळखले. मग यातूनच सुरू झाला महिला सक्षमीकरणाचा प्रवास. त्याला जोड मिळाली ती "सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठाची.
2014 मध्ये "तनिष्का' व्यासपीठाचे सदस्यत्व घेऊन त्यांनी सामाजिक कार्याच्या कक्षा अधिक व्यापक केल्या. लैंगिक शिक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन, अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक जागृती उपक्रम राबविले. स्वतःचा एक गट तयार करून महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले. कळमेश्‍वर "तनिष्का' गटातील आज सात ते आठ महिलांचे उद्योग यशस्वीपणे सुरू आहेत. हे सगळे शक्‍य झाल ते केवळ जयश्री ह्या महिलांना देत असलेल्या प्रोत्साहनामुळे.
लवकरच "संत्रा बर्फी'चा व्यवसाय
महिलांनी आपल्यातील कलागुण जोपासत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे त्या नेहमी सांगतात. सध्या जयश्री न्यायालय आणि पोलिस यांच्यामधील दुवा बनून महिला सक्षमीकरण आणि त्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे कार्य यशस्वीपणे करत आहेत. लवकरच संत्रा बर्फीचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. (जयश्री गोतमारे ः मो. 9881400408)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayashree saved hundreds of women's world