सरकारी सेवेतून आता "जयश्री' होणार निवृत्त,  मिळणार हे फायदे... 

राज इंगळे 
Sunday, 23 February 2020

मेळघाट व्याघ्रप्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चार हत्ती कार्यरत आहेत. यापैकी जयश्री नावाची हत्ती आता सेवानिवृत्त होणार असल्याचे संकेत या हत्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिले आहेत.

अचलपूर (जि. अमरावती)  : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या कामकरी हत्तींना व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू आहे. त्यामुळे या हत्तींना वेतन आयोगानुसार सुट्या, साप्ताहिक रजा आणि सेवानिवृत्तीही लागू आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असणारी "जयश्री' नावाची हत्ती सेवानिवृत्त होणार असल्याचे संकेत मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पशुचिकित्सक डॉ. अक्षय घटारे यांनी दिले आहेत. 

मेळघाट व्याघ्रप्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चार हत्ती कार्यरत आहेत. यापैकी जयश्री नावाची हत्ती आता सेवानिवृत्त होणार असल्याचे संकेत या हत्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिले आहेत. मात्र, याचा निर्णय तज्ज्ञांच्या टीमकडून तपासणीअंती घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सध्या चार हत्ती कार्यरत आहेत. या चारही हत्तींना कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळत असल्याने वयाच्या साठ वर्षांनंतर किंवा त्या आधीही काम करण्याची प्रतीकारशक्ती पाहून त्यांना सेवानिवृत्त केले जाते. याचाच एक भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पातील "जयश्री' सेवानिवृत्त होणार असल्याचा प्रस्ताव मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

अवश्‍य वाचा- कुख्यात गुंडाच्या हत्येने हादरले तुमसर ​

वेतन आयोगानुसार  मिळतात फायदे

व्याघ्र विभागात कार्यरत हे हत्ती वेतन आयोगानुसार सर्व सुट्या उपभोगतात. शिवाय आठवड्यातून त्यांना एक दिवस साप्ताहिक रजाही दिली जाते. तसेच वर्षातून एकदा तीस दिवसांची सलग रजा असते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांप्रमाणे या हत्तींनाही व्याघ्रप्रकल्पाच्या सेवेत वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती दिली जाते. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून शासनाकडून त्यांना नियमित अर्धा आहार पुरविण्याची तरतूद आहे; तर मरेपर्यंत जंगलातील चारा खाण्याची मुभा आहे. मेळघाटातील व्याघ्रप्रकल्प क्षेत्रांतर्गत वन आणि वन्यजीव संरक्षणार्थ व पर्यटन यात या हत्तींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या प्रत्येक हत्तीचे एक स्वतंत्र डाएट रजिस्टर असून कामाची नोंद घेणारे लॉगबुकसुद्धा आहे. यात हत्ती कधी व कुठून आले, याच्याही नोंदी असल्याचे मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील टूरिझमचे स्वप्नील बागडे यांनी सांगितले. 

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील जयश्री नावाच्या हत्तीची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यानंतर पुढील तपासणी तज्ज्ञांच्या टीमकडून करण्यात येणार आहे. त्यानंतरच जयश्रीच्या सेवानिवृत्तीचा निर्णय घेण्यात येणार आहे. 
- डॉ. अक्षय घटारे 
पशुचिकित्सक मेळघाट व्याघ्रप्रकल्प.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: `Jayashree` will be retired soon; will get such compensation...