माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवाला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी पौष पौर्णिमेला तिथीनुसार साजरा करतात. त्यानुसार शुक्रवार (ता. 10) पौष पौर्णिमेला जन्मोत्सव सोहळा राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा करण्यात आला. 

सिंदखेडराजा (जिल्हा बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी पौष पौर्णिमेला तिथीनुसार साजरा करतात. त्यानुसार शुक्रवार (ता. 10) पौष पौर्णिमेला जन्मोत्सव सोहळा राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा करण्यात आला. 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म हा सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये पौष पौर्णिमेला झाला होता. त्या दिनाचे औचित्य साधून तिथीनुसार हा जन्मोत्सव सोहळा त्यांच्या वंशजांनी साजरा केला. 

हेही वाचा - अकोल्याची मुलगी साकारतेय तानाजी चित्रपटात महत्त्वाची भूमिका

 

ढोल-ताशाच्या निनादात शोभायात्रा
सकाळी सूर्योदयाच्या प्रारंभी जिजाऊंच्या पुतळ्याचे औक्षण महिलांनी केले. त्यानंतर राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यापासून ढोल-ताशाच्या निनादात शोभायात्रेला (नगर परिक्रमेला ) सुरवात झाली. राजे लखुजी जाधव यांच्या वंशजांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता. सिंदखेडराजा नगरीतून नगरपरिक्रमा करत या शोभायात्रेचा समारोप राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाडा समोर झाला. या शोभायात्रेमध्ये राजे लखुजी जाधव यांचे वंशज असलेल्या आडगावराजा, किनगावराजा, मेहुणाराजा, देऊळगाव राजा, जवळखेड उमरद येथील जाधव कुंटुबीय सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jijau janmotsav at sindkhedraja buldana