प्रेरणादायी... संपूर्ण व्यसनमुक्ती याच एकमेव ध्यासाने सुरू आहे ‘मुक्तिपथ’चा प्रवास  

Journey of ‘Muktipath’ in Gadchiroli district towards complete  de-addiction
Journey of ‘Muktipath’ in Gadchiroli district towards complete de-addiction

गडचिरोली : नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला निरक्षरता हा एक शाप आहे. येथील आदिवासीबहुल नागरिकांना अद्याप शिक्षणाचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही. उदरनिर्वाहासाठी जगणे एवढेच त्यांना माहिती आहे. निरक्षरतेमुळे तेथील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात आहे. घरातील कुटुंबप्रमुखाच्या दारूच्या व्यसनामुळे अख्खे कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त झाले आहे. घरातला पुरुष कमावतो ते केवळ दारूसाठी असेच चित्र बहुतांश घरचे असल्याने घरातील महिला आपल्या चिल्यापिल्यांसह कामावर राबताना दिसतात. हीच बाब ‘मुक्तिपथ’च्या सदस्यांच्या लक्षात आली. नागरिकांच्या रक्तात भिनलेले व्यसन बाहेर काढायचेच, या विचाराने ‘मुक्तिपथ’च्या माध्यमातून कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी आपले काम सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. आज गावातील तरुणाई व्यसनाधीनतेपासून परावृत्त होत आहे. संपूर्ण व्यसनमुक्ती हाच ध्यास असल्याचे ‘मुक्तिपथ’चे अरुण भोसले सांगतात.
   
अरुण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत गेल्या सात वर्षांपासून सामाजिक परिवर्तनाचे काम करीत आहे. समाजात दारूचा प्रश्न अत्यंत जटिल आहे. सरकारी धोरणे दारूच्या उत्पादनासाठी पोषक आहेत. अशा परिस्थितीत पिणाऱ्या व व्यसनी बनलेल्या नागरिकांना रामभरोसे सोडणे म्हणजे एकप्रकारे व्यसनी व्यक्तीवर व त्याच्यामुळे आयुष्यभर तणावात, दुःखात जगणाऱ्या त्यांच्या कुटुंबावर अन्यायच आहे. या व्यसन उपचार प्रक्रियेतून किमान शारीरिक व मानसिक त्रास कमी करणे, रुग्णांवर औषधोपचार करणे तसेच कुटुंबातील ताणतणाव कमी करून दारू सोडण्यासाठी रुग्णाला प्रेरित केले जाते. एखाद्या व्यक्तीची दारू सोडायची इच्छा आहे, परंतु व्यसनात आकंठ बुडाल्याने ते शक्य होत नसल्यास मुक्तिपथचे सहकारी अशा व्यक्तीचा पिच्छाच पुरवतात. समुपदेशन, औषधोपचार आदी प्रकारातून त्या व्यक्तीवर उपचार केले जातात. याशिवाय इतरांनाही व्यसनापासून परावृत्त केले जाते.

मुक्तीपथतर्फे दोन प्रकारे सुविधा सुरू केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यातून एकदिवसीय तालुका क्लिनिक भरवले जाते. हे उपचार तीन महिने चालतात. दुसरे म्हणजे गावपातळीवरील व्यसन उपचार शिबिर. गावात जाऊन दारू पिणाऱ्या रुग्णांची तपासणी व समुपदेशन करून औषधोपचार केले जातात. अत्यंत गंभीर व्यसनी रुग्णांना सर्च दांतेश्र्वरी रुग्णालयात पाठवण्याची सुविधा केली जाते. अरुण भोसले सध्या मुक्तिपथमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असून, त्याची पोस्टिंग गडचिरोली येथील सर्च हॉस्पिटलमध्ये आहे. तो सर्चअंतर्गत असलेल्या मुक्तिपथ प्रोजेक्टवर गडचिरोली, धानोरा, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यात व्यसन उपचार समुपदेशक म्हणून काम करतो. 

मूळचा कारोची, ता. हातकणंगले, जी. कोल्हापूर येथील असलेल्या अरुण याच्या घरची स्थिती काही वेगळी नव्हती. कुटुंबप्रमुख दारूच्या आहारी गेल्यावर कुटुंबाची कशी वाताहात होते, हे अरुणने अनुभवले होते. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्या साऱ्या वेदना त्याने कुटुंबीयांसह भोगल्या आहेत. परंतु सुदैवाने 2013 मध्ये वडिलांची दारू सुठली. आपण भोगलेल्या वेदना कुणाच्याही वाट्याला येऊ नये, याच विचाराने अरुणने दारूच्या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. मुक्तिपथने दारूबंदीसंदर्भातील प्रभावाच्या आधारे गावांचे विविध गटात वर्गीकरण केले आहे. जी गावे दारूबंदी झुगारून दारूनिर्मिती व विक्री सुरूच ठेवतात, अजिबात जुमानत नाहीत, अशा गावांना "बी' वर्गाची श्रेणी देण्यात आली आहे. या "बी' चा अर्थ "बदमाश' असा आहे. या बदमाश गावांवर अंकुश ठेवल्यास दारूबंदी अधिक प्रभावी होईल, असा विश्‍वास मुक्तिपथला आहे. 

‘निर्माण’मुळे अंतर्बाह्य बदल

निर्माणमध्ये आल्यावर मला मी जे सामाजिक काम करत आहे ते अधिक अचूक व नेमकेपणाने कसे करायचे हे समजले. समाजातील भेडसावणारा असा प्रश्न निवडा जो तुम्ही बदलू इच्छिता, असे येथे सांगण्यात आले. दारूचे व्यसन हा असाच गंभीर प्रश्न आहे जो मला सोडवायचा आहे. सामाजिक कार्यात असल्याने विविध संस्था, संघटनांशी संबंध होताच. तो संबंध निर्माणने अधिक व्यापक केला. मला ‘सोशल चेंज मेकर’ अशी नवी ओळख मिळाल्याचे अरुण सांगतो.  

पोलिसांचे सहकार्य महत्वाचे
सामाजिक कार्य तर करायचे आहे, परंतु त्यासाठी वेळ कसा काढायचा, हा प्रश्न असतो. निर्माण शैक्षणिक प्रक्रियेतून या प्रश्नाचे उत्तर मिळाले. वेगळा वेळ काढायची गरज नाही तर आपल्या कामाला जर समाजाच्या हिताचे बनवता आले किंवा आपण समाजातील जटिल प्रश्नांना जर आपले काम बनवले तर ते सर्वात मोठे मानवतेचे कार्य बनून जाईल. आम्ही जेव्हा एखाद्या गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करतो तेव्हा त्या गावापासून प्रेरणा घेऊन इतरही गावे आपल्या गावात दारू निर्मिती किंवा विक्री होऊ देत नाहीत. पण, काही गावे ऐकायलाच तयार नसतात. गडचिरोलीसारख्या शहरातही असे काही परिसर आहेतच. त्यामुळे या कामात पोलिसांचे सहकार्य महत्वाचे आहे.
अरुण भोसले, सदस्य, मुक्तिपथ, गडचिरोली


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com