मृत्यू जवळ येताना दिसताच 'त्यांनी' घेतला महत्वाचा निर्णय; प्रेरणादायी काम करून मिळवलं अमरत्व

केवल जीवनतारे
Thursday, 24 December 2020

ज्यांचे जगणे अवयवांच्या प्रतीक्षेत आहे, अशा व्यक्तींची यादी तपासली. सुपरमध्ये २२ वर्षीय युवती तर ऑरेंज सिटीत ४० वर्षीय युवक किडनीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समन्वयक वीणा वाठोरे यांच्याकडून मिळाली.

नागपूर  ः उपराजधानीतील मनीषनगर येथील रहिवासी जुगेश गोंडाणे (वय ५४) यांनी मृत्यूला कवटाळताना दोन्ही किडनीचे दान करून उपराजधानीतील दोघांचा जीव वाचवला. तर बुबुळ प्रत्यारोपणातून चौघांच्या डोळ्यांमध्ये उजेडाची पेरणी करण्यात आली. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटीतील २२ वर्षीय युवतीसह ४० वर्षीय युवकाला या किडनीदानातून जीवनदान मिळाले. घरातील कर्ता पुरुष अपघातामध्ये दगावला. परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला. यानंतरही गोंडाणे कुटुंबीयांनी अवयवदानाचा संकल्प करीत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. 

विशेष असे की, कोरोनाच्या आणिबाणीच्या काळातील हे अवयवदान असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. मनीषनगर रेल्वपुलानजीक नुकताच अपघात झाला. मेंदूला गंभीर दुखापत झाली. गोंडाणे कुटुबीयांनी तत्काळ संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यानंतर ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

अधिक माहितीसाठी - हुंडाबळी : पन्नास लाखांसाठी महिला डॉक्टरचा छळ; पतीला २६ पर्यंत पीसीआर
 

मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. शैलेंद्र अंजनकर यांच्या निरीक्षणात क्रिटीकल केअर सर्जन डॉ. राजेश अटल यांनी उपचार सुरू केले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली. मेंदूपेशी मृत्यू पावल्या असल्याचे सांगण्यात आले. जुगेश गोंडाणे यांचे भाऊ डॉ. गोंडाणे, तसेच छाया जुगेश गोंडाणे यांना माहिती देण्यात आली. १८ वर्षीय मुलगी सजल आणि १५ वर्षीय मुलगा यश यांच्यासह कुटुंबानी चर्चा करीत अवयवदानाचा संकल्प केला. 

यकृतासह दोन्ही किडन्या, डोळे दान करण्याचा निर्णय झाला. सेव्हन स्टार हॉस्र्पिटलमध्ये यकृत पोहचवण्यात आले, मात्र यकृत निकामी झाल्याने प्रत्यारोपीत होऊ शकले नाही. मात्र किडनीदानातून दोघांना जीवनदान मिळाले. अवयवदानाची परवानगी दिल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांना सुचना देण्यात आली. 

ज्यांचे जगणे अवयवांच्या प्रतीक्षेत आहे, अशा व्यक्तींची यादी तपासली. सुपरमध्ये २२ वर्षीय युवती तर ऑरेंज सिटीत ४० वर्षीय युवक किडनीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समन्वयक वीणा वाठोरे यांच्याकडून मिळाली. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यकृत, किडनीसह डोळे संबंधित रुग्णालयात पोहचवण्यात आले.

 

नागपुरातील ६७ वे अवयवदान

उपराजधानीत मेंदूमृत्यू झालेले हे ६७ वे अवयव दान असून आतापर्यंत झालेल्या ११७ जणांचा किडनी प्रत्यारोपणातून जीव वाचवण्यात आला. गुरूवारी झालेल्या सुपर स्पेशालिटीतील प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया किडनी शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. पीयुष किंमतकर, डॉ. अजित पटेल, डॉ. निखार, डॉ. मिरज शेख यांनी केली. यात एका २२ वर्षीय युवतीचा किडनी दानातून जीव वाचवला. तर ऑरेंज सिटीतील किडनी दानाचे प्रत्यारोपण डॉ. संदीप देशमुख, डॉ. धनंजय बोकरे, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. कविता धुर्वे, डॉ. एस. जे. आचार्य, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. नीता देशपांडे, डॉ. अनिता पांडे यांनी केले असून ४० वर्षीय युवकाला जीवनदान दिले. 
 
संपादन : अतुल मांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jugesh Gondanes organ donation gives life to both