चंद्रपुरात कोविड रुग्णांच्या सेवेसाठी जम्बो रुग्णालय सज्ज; आता कधी होणार सुरू

साईनाथ सोनटक्के
Saturday, 17 October 2020

नागपूर येथील प्रशांत बोरूले यांच्या पुढाकारातून डॉ. अनुप वासाडे यांनी शकुंतला लॉन येथे जम्बो रुग्णालयाची परवानगी महानगरपालिका प्रशासनाकडे मागितली. अखेर, गंगाकाशी रुग्णालयाला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली. आता रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

चंद्रपूर : मागील काही महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला होता. शेकडोंच्या संख्येने रुग्णांची भर दिवसागणिक पडत होती. आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत होता. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय दरात ७०० खाटांचे जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय गंगाकाशी व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार येथील नागपूर मार्गावरील शकुंतला लॉनवर रुग्णालय सज्ज झाले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ परवानगीची प्रतीक्षा आहे.

परवानगी मिळताच पहिल्या टप्प्यात शंभर खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक दीप दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाच महिन्यांत वाढले १२ हजारांवर रुग्ण

देशासह राज्यात कोरोनाची मार्च महिन्यात एंट्री झाली. मात्र, तब्बल तीन महिने जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यानंतर हळूहळू रुग्ण वाढू लागले. बघता बघता मागील पाच महिन्यांत रुग्णांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. एवढ्या मोठ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली. यातून शहरातील १७ खासगी डॉक्‍टरांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली.

अवश्य वाचा : कोरची तालुक्‍यात विजेसह दूरसंचार सेवेतही समस्या; बीएसएनएल, महावितरण कंपनीवर जनतेमध्ये नाराजी

मनपा प्रशासनाकडून मंजुरी

नागपूर येथील प्रशांत बोरूले यांच्या पुढाकारातून डॉ. अनुप वासाडे यांनी शकुंतला लॉन येथे जम्बो रुग्णालयाची परवानगी महानगरपालिका प्रशासनाकडे मागितली. मनपा प्रशासनानेही रुग्णांची गरज ओळखून रुग्णालयाला तातडीने परवानगी दिली आहे. मात्र, या रुग्णालयावरून चांगलेच वादंग उठले होते. यातून आलेल्या नैराश्‍याने रुग्णालय व्यवस्थापनाने गाशा गुंडाळण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मंत्रालयस्तरावर हालचाली करण्यात आल्या.

सध्या शंभर खाटांचे रुग्णालय

अखेर, गंगाकाशी रुग्णालयाला मंत्रालयातून परवानगी देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचे काम आजघडीला पूर्ण करण्यात आले आहे. शंभर खाटांचे आयसीयू रुग्णालय आता सज्ज झाले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून परवानगी प्राप्त होताच रुग्णालय सुरू केले जाणार आहे.

जाणून घ्या : तब्बल आठ महिन्यांपासून सुरु होता रक्त तपासणीचा गौरखधंदा; अखेर पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई

शासकीय दरानुसारच घेणार रुग्णांकडून पैसे

डॉ. अनुप वासाडे, डॉ. राय यांच्यासह अन्य डॉक्‍टरांची चमू येथे सेवा देणार आहे. 40 परिचारिकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या रुग्णालयात सेवा देणार आहेत. शासकीय दरानुसारच रुग्णांकडून पैसे घेतले जाणार असल्याचे डॉ. अनुप वासाडे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला दीप दवे, डॉ. राय, दीक्षित उपस्थित होते.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Hospital ready to serve Kovid patients in Chandrapur