काटोलमध्ये इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर प्रकल्प

अंकुश गुंडावार
गुरुवार, 11 मे 2017

संत्रा लागवड ते त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतचा हा विदर्भातील एकमेव इंटिग्रेटेड प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे संत्री उत्पादकांचे अर्थकारण आणि चेहरामोहरा बदलण्यास नक्‍कीच मदत होईल.
- आशीष देशमुख, आमदा

नागपूर - विदर्भातील संत्री, डाळिंब उत्पादकांना सक्षम करण्यासाठी कोलकाता येथील डालग्रीन ऍग्रोबेस कंपनीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील काटोल येथे संत्री आणि डाळिंब प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याची सुरुवात नुकतीच झाल्याने विदर्भातील संत्री व डाळिंब उत्पादकांना आशेचा किरण गवसला आहे.

विदर्भात दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड केली जाते. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून संत्री उत्पादकांना अल्पदराचा फटका सहन करावा लागत आहे. उत्पादनाच्या तुलनेत संत्र्यांना मागणी आणि प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने विविध अडचणींना तोंड द्यावे लागतो. हीच अडचण आणि नागपुरी संत्र्याची ख्याती लक्षात घेत कोलकाता येथील डालग्रीन ऍग्रोबेस कंपनीने काटोल येथे संत्री व डाळिंब लागवड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. "फार्म टू फर्म' संकल्पनेवर संत्री उत्पादकांना बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी काटोलात 118 एकर जागा खरेदी केली. हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांत कार्यान्वित होईल. यासाठी या प्रकल्पाला इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर प्रकल्प असे नाव दिले आहे. शेतकऱ्यांना संत्री रोपांची लागवड, त्यांचे संगोपन, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन, शीतगृह, उत्पादित मालाला बाजारपेठ, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रॅन्डिंग आदी गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यालाच इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर प्रकल्प म्हटले जाते. संत्री उत्पादकांना इस्त्रायल पद्धतीने संत्री लागवड करण्याचे मार्गदर्शन, त्यासंबंधीचे उपयुक्त तंत्रज्ञान डालग्रीन कंपनी उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प नागपूर विभागापुरता मर्यादित नसून, संपूर्ण विदर्भातील संत्री उत्पादकांना याचा लाभ होईल. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होऊन त्यातून उत्पादन सुरू होण्यास किमान चार-पाच वर्षे लागतील. सद्य:स्थितीत काटोल तालुक्‍यातील झिल्पा, गोडन्नी, मोहगाव, जाटमांजरी या भागात संत्रा लागवडीचे काम सुरू असल्याचे या प्रकल्पाचे संचालक विवेक केजरीवाल यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण
काटोल तालुक्‍यात संत्रा व डाळिंब प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प एवढ्या जलदगतीने कार्यान्वित करण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. फार कमी कालावधीत ही प्रक्रिया पार पाडून उद्योजकांना सहकार्य करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असावे. हा प्रकल्प काटोल तालुक्‍यात कार्यान्वित व्हावा, यासाठी आमदार आशीष देशमुख यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा आणि सहकार्य केल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

संत्रा लागवड ते त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतचा हा विदर्भातील एकमेव इंटिग्रेटेड प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे संत्री उत्पादकांचे अर्थकारण आणि चेहरामोहरा बदलण्यास नक्‍कीच मदत होईल.
- आशीष देशमुख, आमदार.

दरवर्षी 24 हजार टन संत्री
संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यावर दरवर्षी त्यांना 24 हजार टन संत्रा लागेल. सुरुवातीला या प्रक्रिया प्रकल्पात प्रतितास 2 टन आणि त्यानंतर प्रतितास पाच टन संत्र्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे संत्र्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने संत्री उत्पादकांना चांगला दर मिळण्याची शक्‍यता आहे.

विविध वस्तूंची निर्मिती
संत्र्यांवर प्रक्रिया करून त्यापासून आइस्क्रीमचे फेव्हर, सौंदर्य प्रसाधने, योगार्डस, ज्यूस प्युरीज, ब्रेकरी प्रोडक्‍टस तयार केले जातील. हे सर्व विदेशात निर्यात केले जाईल. त्यांची गुणवत्तादेखील त्याच धर्तीवर राहील.

असे आहेत प्रकल्पाचे टप्पे
पहिला टप्पा
- इस्त्रायल तंत्रज्ञानाने 100 हेक्‍टरवर संत्रा लागवड
- शेतकऱ्यांना इस्त्रायल तंत्रज्ञानाने संत्रा लागवडीचे मार्गदर्शन,
-उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल.

दुसरा टप्पा
- शीतगृह, ग्रेडिंग, स्टोअरेज आणि पॅकेजिंग,
- तीन हजार टन क्षमतेचे दोन कोल्ड स्टोअरेज
- प्रतितास दोन टन संत्र्यांवर प्रक्रिया
- ग्रेडिंग ऍण्ड पॅकेजिंग युनिट

तिसरा टप्पा
प्रतितास पाच टन संत्र्यांवर प्रक्रिया
चौथ्या टप्प्यात
फ्रूट प्रोसेसिंग पार्कची उभारणी

Web Title: Katol to have food park