पुनर्वसनासाठी "तारीख पे तारीख'  खापरीवासींमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा 

रवींद्र कुंभारे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुनर्वसन प्रक्रिया चालू आहे असे सांगून पुनर्वसनाचा प्रश्न लांबणीवर टाकण्यात येत असल्याने खापरीवासींनी प्रशासनावरचा असंतोष व्यक्त केला.

गुमगाव, (जि. नागपूर) : "स्मार्ट सिटी' म्हणून विकसित होणाऱ्या नागपूर शहराचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित मिहान प्रकल्पामध्ये जमिनी गेलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासोबतच अनेक मूलभूत समस्या अद्याप निकाली निघाल्या नाहीत. या समस्या मार्गी लावण्यासाठी खापरीतील युवकांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. खापरीवासींना पुनर्वसनासाठी आश्‍वासनाबरोबरच केवळ "तारीख पे तारीख' दिल्या जात असल्याची खंत व्यक्त केली. 

मिहान प्रकल्पांतील उच्चशिक्षित तरुण-तरुणी आजही नोकरीच्या शोधात आहेत. प्रकल्पग्रस्त आहोत, असे म्हणताच त्यांना कंपनीच्या गेटवरून बाहेर केल्या जात असल्याचे खापरीतील तरुणांनी सांगितले. प्रकल्पातील मोठे गाव असलेल्या खापरी (रेल्वे) या गावाचे अद्याप पूर्णतः पुनर्वसन करण्यात आले नाही. पुनर्वसन प्रक्रिया चालू आहे असे सांगून पुनर्वसनाचा प्रश्न लांबणीवर टाकण्यात येत असल्याने खापरीवासींनी प्रशासनावरचा असंतोष व्यक्त केला. गावांतील युवकांनी एकत्र येऊन मुख्य अभियंता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन

तातडीने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा व या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी मिहानच्या सभागृहात बैठक बोलवा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते लखन महाकाळकर, विठ्ठल जुमडे, गोपाल वांगे, लक्ष्मण रोकडे, नितीन लोखंडे, गोपाळ महाकाळकर, अरुण झुंजुरकर, सुनील झाडे, सिद्धार्थ बोरकर, सेवकराम सोनटक्‍के, मोरेश्वर तेलरांधे, प्रेमदास रोकडे यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. 

हे प्रश्‍न अद्यापही कायम 

गावातील मूळ रस्त्यावरील बंद रेल्वे फाटक, शालेय विद्यार्थ्यांसोबतच मजूर महिला व पुरुषांना दररोज होणारा पाच किलोमीटर अडचणींचा फेरा, बंद करण्यात आलेला गावातील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग यासारखे गंभीर प्रश्न प्रकल्पग्रस्तांसमोर उभे आहेत. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. 

मिहानमधील कंपन्यात नोकरी हवी 

खापरी गावातील अनेक तरुण आजही नोकरीच्या शोधात आहेत. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यात नोकरीसाठी गेलेल्या तरुणांना मात्र प्रकल्पबाधित असल्याचे सांगितल्या घेतले जात नाही. यामुळे मिहानमध्ये सुरू होणाऱ्या कंपन्यात प्रकल्पबाधित स्थानिकांना सर्वांत आधी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली. 

किती दिवस चालणार पुनर्वसन
 
मिहान प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून खापरी व आसपासच्या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहेत. यामुळे नागरिकांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत असून पुनर्वसनाचे काम लवकरात लवकर योग्य पद्धतीने व पूर्ण करण्यावरही चर्चा करण्यात आली. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khapri youth movement for rehabilitation