काय? महिलांचा चिमुकल्याचा अपहरणाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

रेड्डीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करायचा आहे. तू मला मदत कर, मदत न केल्यास तुलाही खोट्या गुन्ह्यात अडकवेल, अशी धमकी सोनालीने गुरबसे यांना दिली. तरीही मदत न केल्याने सोनालीने चिमुकल्याचा अपहरणाचा प्रयत्न केला; मात्र तो फसला.

 

नागपूर ः अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात मदत न केल्याने महिलेने मैत्रिणीच्या मदतीने एक वर्षीय चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, महिलेचा हा प्रयत्न फसला. ही घटना मानकापूरमधील मातानगर येथे शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी सोनाली साखरे ऊर्फ सिमरण शर्मा (वय 30, रा. मोहननगर) व तिच्या मैत्रिणीविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. श्री. दिगांबर गुरबसे (वय 28, रा. मातानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरबसे या पतीपासून विभक्त राहतात. त्या एक वर्षीय मुलगा रेवंत याच्यासोबत आईकडे राहतात. काही दिवसांपूर्वी जिममध्ये त्यांची रेड्डी सर व सोनालीसोबत ओळख झाली. दोन महिन्यांपूर्वी सोनाली ही गुरबसे यांच्या घरी आली. रेड्डीबाबत विचारणा केली. पैशाची गरज भागविण्याचेही ती बोलली. रेड्डीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करायचा आहे. तू मला मदत कर, मदत न केल्यास तुलाही खोट्या गुन्ह्यात अडकवेल, अशी धमकी सोनालीने गुरबसे यांना दिली. गुरबसे यांनी समजूत घालून तिला परत पाठविले.

 

हे ही वाचा - सिंचन घोटाळा प्रकरणाची सुनावणी १५ जानेवारीपर्यंत स्थगीत

 

शनिवारी दुपारी सोनाली व तिची मैत्रीण मातानगर येथे आले. त्यांनी गुरबसे यांना आवाज दिला. गुरबसे बाहेर आल्या. त्यांच्यासोबत मुलगाही होता. तुझ्या पतीने मुलाला आणण्यासाठी पाठविले आहे. एक लाख रुपये दिले आहेत. मुलाला तुझ्या पतीच्या स्वाधीन केल्यास पुन्हा एक लाख रुपये मिळतील, असे म्हणत सोनालीने रेवंत याला ताब्यात घेतले. गुरबसे यांनी सोनालीच्या तावडीतून रेवंत याची सुटका केली. गुरबसे यांनी आरडाओरड केली असता सोनाली व तिची मैत्रीण पसार झाली. गुरबसे यांनी मानकापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सतर्कतेने प्रयत्न फसला

जागनाथ बुधवारी भागात सतर्कतेमुळे 12 वर्षीय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. ही घटना शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. तहसील पोलिसांनी मोपेडचालकाविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पर्व समीर खुटिया (वय 43, रा. पिवळी मारबत) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. समीर यांचे पिवळी मारबत भागात भांड्याचे दुकान आहे. पर्व हा सहाव्या वर्गात शिकतो. शनिवारी सकाळी तो बाजारात जात होता. युवकाने बळजबरीने त्याला मोपेडवर बसविले. त्याला जागनाथ बुधवारी भागात घेऊन गेला. याचदरम्यान पर्व याने युवकाला चिमटी काढली व मोपेडवरून उडी मारली. तो घरी आला. घटनेची माहिती दिली. समीर यांनी तहसील पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मोपेडचालकाचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping attempt in Nagpur