तिने स्वत:च रचले स्वत:च्या अपहरणाचे नाट्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

रेल्वे भोपाळ स्थानकावर पोचली. मात्र, ती युवती त्यात नव्हती. तिचा भ्रमणध्वनीही बंद होता. शेवटी कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्याच दिवशी 19 मार्चला तिचा भ्रमणध्वनी इटारसी रेल्वेस्थानकावरील एका नालीत सापडला.

चंद्रपूर : मध्यप्रदेशातील बैतुल येथील एक युवती भोपाळ येथे आपल्या आत्याला भेटण्यासाठी रेल्वेने निघाली. इटारसी रेल्वेस्थानकाजवळ तिचे अपहरण झाले. पोलिसांनी शोध सुरू केला. तिचे लोकेशन चंद्रपुरात असल्याचे कळले. मध्यप्रदेश पोलिस तिच्या शोधात येथे पोचले आणि अपहरण नाट्याला वेगळीच कलाटणी मिळाली. ती प्रियकरासाठी इथे पोचली होती. शुक्रवारी (ता.20 ) दोघांनी लग्नही केले आणि पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला.
बैतुल येथून ही युवती 18 मार्चला छिंदवाडा-नवी दिल्ली एक्‍स्प्रेसने भोपाळला जायला निघाली. भोपाळला तिची आत्या राहते. त्यांच्याकडे तिची लहान बहीण असते. तिचा वाढदिवस आहे. तिला भेटण्यासाठी जाते, असे तिने आईला सांगितले.

दरम्यान इटारसी रेल्वेस्थानकाजवळ पोचताच तिने आपल्या भ्रमणध्वनीवरून आत्याशी संपर्क साधला. माझ्या बोगीतील काही मुले माझी छेड काढत आहेत. त्यामुळे इटारसी रेल्वेस्थानकावर मी बोगी बदलणार, असे तिने सांगितले. त्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतित झाले. ते तिची भोपाळ रेल्वेस्थानकावर प्रतीक्षा करीत होते. दर पंधरा मिनिटांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. तिने काही वेळानंतर त्यांच्या कॉलला प्रतिसाद देणे बंद केले. दरम्यान, भोपाळ रेल्वे स्थानकापूर्वी तिचा भ्रमणध्वनी बंद झाला आणि कुटुंबीयांच्या चिंतेत आणखी भर पडली.
रेल्वे भोपाळ स्थानकावर पोचली. मात्र, ती युवती त्यात नव्हती. तिचा भ्रमणध्वनीही बंद होता. शेवटी कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्याच दिवशी 19 मार्चला तिचा भ्रमणध्वनी इटारसी रेल्वेस्थानकावरील एका नालीत सापडला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आणि कॉल डिटेल्स तपासले. तेव्हा प्रवासादरम्यान ती एका युवकाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आणि अपहरण नाट्याचा उलगडा व्हायला सुरवात झाली

. या युवतीचे वडील रेल्वेत भद्रावती येथे नोकरीला होते. सात महिन्यांपूर्वी त्यांची बदली बैतुल येथे झाली. ते मूळचे मध्यप्रदेशातीलच आहेत. तत्पूर्वी, तिचे याच गावातील एका भिन्न धर्मीय युवकाशी प्रेमसंबंध जुळले होते. कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्याच युवकाच्या बोलविण्यावरून ती येथे पोचली. तिच्यामागे मध्यप्रदेश रेल्वे पोलिसही पोचले. रामनगर पोलिसात ते दिवसभर ठाण मांडून होते. परंतु, हे प्रेमियुुगुल त्यांच्या हाती लागले नाही. शेवटी सायंकाळी 6 वाजताच्या सुमाराला ते दोघेही ठाण्यात हजर झाले. त्यांनी विवाह केला होता. मुलीने धर्मपरिवर्तन केले होते. ते दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यांची नोंद घेऊन सोडून दिले.

सविस्तर वाचा - गुड न्युज! गुड न्युज! गुड न्युज! कोरोनाच्या विळख्यातुन सहीसलामत
मुलगी उच्चविद्याभूषित आहे. मुलाचा भूखंड खरेदी-विक्री आणि हॉटेलचा व्यवसाय आहे. मुलगी सुखरूप सापडल्याने आणि तिच्या मर्जीने लग्न केल्याचे समोर आल्याने मध्यप्रदेश पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. प्रवासादरम्यान जो युवक तिच्या संपर्कात होता तो तिच्या प्रियकराचा चंद्रपुरातील मित्र होता. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला दिवसभर ताब्यात ठेवले. अपहरण नाट्यावरून पडदा उठल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping drama by girl