प्रेमप्रकरणातून युवतीवर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

यवतमाळ : प्रेमप्रकरणात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने युवतीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (ता.दोन) सायंकाळी सातला दारव्हा मार्गावरील ट्रॅव्हल्स पॉइंटसमोर घडली. नागरिकांनी तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला.

यवतमाळ : प्रेमप्रकरणात लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणाने युवतीवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (ता.दोन) सायंकाळी सातला दारव्हा मार्गावरील ट्रॅव्हल्स पॉइंटसमोर घडली. नागरिकांनी तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला.
नंदकिशोर चौधरी (वय 26, रा. साहूर,जि. वर्धा ), असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याचे गावातील 17 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. शिक्षण घेण्यासाठी ती यवतमाळात राहत होती. तरुणाने लग्न करण्याचा तगादा लावला. त्यासाठी तिने नकार दिला. एकदा बोलायचे आहे, असे म्हणून भेटण्यासाठी युवतीला ट्रॅव्हल्स पॉइंटजवळ बोलावले. यावेळी तिच्यासोबत घरमालकीन होती. चर्चा सुरू असताना तरुणाने लग्नाचा विषय काढला. अल्पवयीन असून, हा विषय इथेच संपव.
मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, असे युवतीने सांगितले. त्यामुळे रागाच्या भरात तरुणाने त्याच्या जवळ असलेला चाकू युवतीच्या पोटात भोसकला. हा प्रकार लक्षात येताच घरमालकीनने आरडा ओरड केला. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जात असलेल्या तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठले. जखमी युवतीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

जखमी युवती व तरुण दोघेही वर्धा जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी आहेत. लग्नास नकार दिल्याने युवतीवर चाकू हल्ला करण्यात आला. दोघांवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणात लवकरच गुन्हा नोंदविण्यात येईल.
-धनंजय सायरे,
ठाणेदार, शहर पोलिस ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on young girl in love