esakal | संपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी   
sakal

बोलून बातमी शोधा

Know Vidarbha Gram Panchayat Elections Results on one click

या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी सर्वच पक्षाच्या प्रमुख पक्षांनी अपवाद वगळता आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहे.

संपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी   

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी सर्वच पक्षाच्या प्रमुख पक्षांनी अपवाद वगळता आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुका दोन टप्प्यात असल्याने तेथील मतमोजणी शुक्रवारी (ता. २२) होणार आहे.

नागपुरात काँग्रेसची मुसंडी

नागपूर ः काट्याची लढत ठरलेली नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निकालानंतर राजकीय पक्षांतून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असले तरी निकालावरुन काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. १२९ ग्रामपंचायत निकालापैकी काँग्रेस ८३, राष्ट्रवादी काँग्रेस १४, शिवसेना ५, भाजप २५ व अपक्ष २ जागेवर विजयी झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील बड्या-बड्या भाजप नेत्यांच्याच घरात भाजपाला दारुण पराभव झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते गावागावात प्रचंड उत्साहात विजय साजरी करताना दिसत आहे.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

वर्ध्यात संमिश्र कौल

वर्धा : जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप समर्थनात असलेल्या ग्रामपंचायतींना मतदारांनी संमिश्र कौल दिला. काही ठिकाणी अटीतटीच्या स्थितीत निकाल लागले. समुद्रपूर तालुक्‍यातील कांढळी ग्रामपंचायतीत वॉर्ड क्रमांक एकमध्ये दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यामुळे तेथे ईश्‍वरचिठ्ठीने विजयाचा निर्णय झाला. सर्वाना धक्‍का देणारा निकाल आष्टी तालुक्‍यातील तळेगाव (श्‍यामजीपंत) येथील ठरला. येथे सतत २० वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत यावेळी एका स्वतंत्र पॅनेलने बळकावली. सेलू तालुक्‍यातील हिंगणी ग्रामपंचायतीत भाजप आमदार डॉ. पंकज भोयर गटाला पराभव स्वीकारावा लागला. सर्वाधिक ग्रामपंचायती असलेल्या समुद्रपूर तालुक्‍यात भाजपचा बोलबाला असताना महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी नव्या समीकरणांचे संकेत देत आहे.

जेएनयूतून पीएचडी करणारा विजयी

चंद्रपूर ः जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. जिल्ह्यात काँग्रेसने ६५ टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून ७५ टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्थीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडीने यश संपादित केले. जिल्ह्यातील ३३९ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा पक्षाने केला आहे. माजी पालकमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील विसापूर ग्रामपंचायतीवर मात्र वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व राहिले. गोंडपिंपरी तालुक्‍यातील विहिरगाव येथे एकाचा निकाल ईश्‍वरचिठ्ठीने झाला. मूल तालुक्‍यातील चितेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जेएनयूमध्ये पीएचडी करणारे व नागपूर उच्च न्यायालयात वकिली करणारे डॉ. कल्याण कुमार विजयी झाले.

भंडाऱ्यात दावे-प्रतिदावे

भंडारा : सर्वाधिक ८५ ग्रामपंचायतीत समर्थकांचा विजय झाल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केला. तसेच भाजप समर्थित पॅनेलचा सर्वाधिक ९० ठिकाणी विजय झाल्याचा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत खोब्रागडे यांनी केला आहे.

गोंदियात मनसेने उघडले खाते

गोंदिया ः जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मनसेसह चावी संघटनेने खाते उघडले असून, मोठ्या राजकीय पक्षांना यातून धडा मिळाला आहे. गोंदिया तालुक्‍यातील फुलचूर ग्रामपंचायतीत मनसेने एक, तर देवरी तालुक्‍यातील भर्रेगाव येथे दोन जागा जिंकल्यात. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील बाराभाटी ग्रामपंचायतीमध्ये एका जागेचा निर्णय ईश्‍वरचिठ्ठीने झाला.

अमरावतीत दिग्गजांना धक्का

अमरावती : जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसला असून त्याठिकाणी नवतरुणांना मतदारांनी कौल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावती तालुक्‍यातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्‍याम देशमुख यांचा नया अकोला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तर अमरावती तालुका प्रमुख आशिष धर्माळे यांचा बोरगाव धर्माळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव झाला. जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नितीन गोंडाने यांना पळसखेड सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. मागील वेळी काँग्रेसची या ग्रामपंचायतवर निर्विवाद सत्ता होती. वाठोडा शुक्‍लेश्‍वर येथे माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या पॅनेलला पराभव सहन करावा लागला.

अकोल्यात नेत्यांनी राखले गड

अकोला ः जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर, भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य तेजराव थोरात, आमदार अमोल मिटकरी, शिवसेना आमदार नितीन देशमुख आदींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायती कायम राखल्या आहेत. पालकमंत्री बच्चू कडू यांचा निवडणुकीत तसा सहभाग कमीच होता. मात्र हिवरखेड येथे त्यांच्या प्रहार पॅनलचे पाच सदस्य निवडणूक आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात प्रहारचा प्रवेश झाल्याचे मानले जात आहे.

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

यवतमाळात कौल युवकांना

यवतमाळ : प्रस्थापित उमेदवारांना धोबीपछाड देत मतदारांनी युवकांना पसंती दिल्याचे चित्र ग्रामपंचायत मतमोजणीनंतर समोर आले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी तसेच भाजपला आपापल्या भागात विजयी मिळविता आला. मनसे, प्रहारनेही काही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. पालकमंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, शेतकरी नेते देवानंद पवार यांनी आपले किल्ले कायम ठेवले. १९४९ पासून बिनविरोध असणाऱ्या गहुली ग्रामपंचायतीच यावेळी पहिल्यांदाच निवडणूक झाली. याठिकाणी भाजप आमदार ॲड. नीलय नाईक यांनी सर्व सात जागा जिंकून राष्ट्रवादीचे नेते मनोहर नाईक यांना धक्का दिला आहे.

गडचिरोलीत शुक्रवारी मतमोजणी

गडचिरोली : शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील १७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. बुधवारी (ता. २०) दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित १५० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या सर्व ३२० ग्राममंचायतींसाठीची मतमोजणी शुक्रवार दि. २२ ला होणार आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image