esakal | कोयनगुडाच्या विद्यार्थ्यांनी केली नागपूरची सहल
sakal

बोलून बातमी शोधा

भामरागड : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी शेखर सिंह.

कोयनगुडाच्या विद्यार्थ्यांनी केली नागपूरची सहल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भामरागड  : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून भामरागड तालुक्‍यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोयनगुडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी नागपूर येथे तीन दिवसांकरिता शैक्षणिक सहलीचे आयोजन करून मुलांना अविस्मरणीय अनुभव दिला.
यासाठी तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष पाठपुरावा केला. मुख्याध्यापक विनीत पद्मावार यांच्या प्रयत्नाने ही संधी मुलांना मिळाली. 27 ते 29 ऑगस्टदरम्यान सहलीकरिता कोयनगुडा नाल्याला पाणी असतानासुद्धा पालकांनी मोठ्या हौसेने मुलांना डोक्‍यावर उचलून बसपर्यंत आणले. नायब तहसीलदार निखिल सोनावणे, गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनावणे व शाखा व्यवस्थापक यांनी हिरवी झेंडी दाखवून मुलांना रवाना केले. त्यानंतर सेमाना येथे जेवण आटोपून मुलांनी थेट जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कार्यालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी सिंह यांची मुलाखत घेतली व संवाद साधला. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचीही मुलाखत, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर व उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्याही भेटी घेतल्या.
तिसरीच्या विद्यार्थिनींनी 42,43 चा पाढा म्हणून दाखविल्याने त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जिल्हा परिषद अध्यक्ष भांडेकर यांनी दिले. शेवटी "डायट'चे प्राचार्य शरदचंद्र पाटील तथा पूर्ण टिमची भेट घेतली. मिलिंद अघोर यांनी सर्व मुलांना ड्राईंग बुक, कलर, पुस्तके व चॉकलेट दिले. त्यानंतर मुलांनी नागपूरला प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी अंबाझरी गार्डन, दीक्षाभूमी, रमन सायन्स सेंटर, मॉल आदी ठिकाणी भेटी दिल्या.
तिसऱ्या दिवशी बर्डी ते एअरपोर्ट असा मेट्रोतून प्रवास मुलांसाठी अविस्मरणीय राहिला. अभिषेक चौधरी यांनी सहलीतील मुलांना मेट्रोसफर घडवली. त्यानंतर एअरपोर्ट येथे प्रत्यक्ष विमान बघून मुले अवाक्‌ झाली. शेवटी व्हीसीए क्रिकेट मैदान बघितले व आनंदवन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचीही भेट घेतली.
सहलीकरिता रोटरी क्‍लब नागपूरचे निलंजन यांनी सर्वांसाठी निवास, भोजनाची व्यवस्था केली. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनीत पद्मावार, सहशिक्षक वसंत इष्टाम, शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष संतोष हलका व पालकांनी सहकार्य केले.

loading image
go to top