दिवे अन् लक्ष्मीची मूर्ती तयार करणाऱ्यांची दिवाळी अंधारात!

दीपक फुलबांधे
Sunday, 8 November 2020

फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नवनवीन भांडी तयार करतात. त्याच हाताने नवनवीन मूर्ती तयार करतात. मूर्तीला सुंदर रूप दिले जाते. या पारंपरिक व्यवसायावर हजारो कुंभार लोकांचे संसार चालतात

लाखांदूर (जि. भंडारा): कोरोना संकटामुळे पारंपरिक व्यवसाय ठप्प झाल्याने तालुक्‍यातील कुंभार समाजावर आर्थिक संकट कोसळले असून, उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारातच जाणार असल्याची खंत कुंभार बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, येथील दौऱ्यात आमदार डॉ.परिणय फुके यांनी कुंभार समाजाच्या समस्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.  

हेही वाचा - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला...

फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नवनवीन भांडी तयार करतात. त्याच हाताने नवनवीन मूर्ती तयार करतात. मूर्तीला सुंदर रूप दिले जाते. या पारंपरिक व्यवसायावर हजारो कुंभार लोकांचे संसार चालतात. यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यापासून सुरू असलेला कोरोना संकटाचा काळ अजूनही संपला नाही. ग्रामीण भागात कुंभार समाज अजूनही भांडी व मूर्ती तयार करून आपला उदरनिर्वाह चालवतात. हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. काही कुंभार लोकांकडे शेती नसल्यामुळे त्यांच्या खाण्याचे वांदे झाले आहेत. काहीजण मूर्ती, भांडी तयार करून बाजारात विकल्यानंतर आपल्या मुलांचे शिक्षण व संसार चालवतात.

हेही वाचा - अपहरणानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार, फेसबुकवरून झाली होती ओळख

वर्षानुवर्षे चालत असलेल्या या व्यवसायावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदा सर्व व्यावसायिकांनी भांडी तयार केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये बनविण्यात आलेल्या एकाही वस्तूची विक्री झाली नाही. मागील काही दिवसांमध्ये अनेक सण येऊन गेले आहे. आता दिवाळी सुद्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कुंभार समाज आता लक्ष्मीपूजनासाठी देवीची मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. या मूर्तींची विक्री केल्यानंतर आपला उदरनिर्वाह चालवतात. कोरोना संकटामुळे निश्‍चितच कुंभार समाजाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मूर्ती, भांड्यांची विक्री होत नसल्यामुळे कुंभार समाजाला आर्थिक संकटाचा फटका बसणार आहे. या सर्व संकटामुळे यावर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. 

हेही वाचा - आमदार होईल म्हटल्यावर लोकांनी टिंगलटवाळी केली अन् आता शिक्कामोर्तब होताच त्यांनाच आलं भरून

दरम्यान, विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके लाखांदूर तालुका दौऱ्यावर असताना, त्यांनी कुंभार बांधवांच्या वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी कुंभार बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kumbhar community faced financial problems due to corona in lakhandur of bhandara