सायकलने गाठले शंभर किलोमीटर अंतर अन् मध्येच चेन तुटते मग....!

chandrapur labours
chandrapur labours

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाने हॉटेल बंद झाले. कारखान्यातील कामही थांबले. त्यामुळे थांबून काय करणार म्हणून मालकाने त्यांना गावाकडे जाण्यास सांगितले. वाहन नसल्यामुळे त्याने सायकलचीही व्यवस्था करून दिली. अशा स्थितीत गड्या आपला गाव बरा याची जाणीव त्या कामगारांना झाली. अन् तेलंगणातील आसिफाबादवरून ते सायकलने निघाले. शंभर किलोमीटर अंतर गाठायचे होते पण मध्येच सायकलची चेन तुटली अन् मग पायीच गावाला येण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. गावाच्या प्रवेशद्वारावर येताच गावकऱ्यांनी अडवले. सरपंच व प्रमुख मंडळी आली. आरोग्य सेविकेने तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील आकाश वाघाडे, अनिल गोहणे, राहुल बामने, प्रवीण बामने व भोयर हे पाचही जण तेलंगणातील हॉटेल व कंपनीत काम करतात. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. अशावेळी हॉटेल व कंपनीचे काम बंद झाले. यामुळे या मजुरांची चांगलीच आफत झाली. मालकाने तुम्ही गावाकडे जा, असे सांगितले. वाहन नसल्याने या पाचही लोकांना पाच सायकली दिल्या. बोरियाबिस्तर घेऊन ही मंडळी करंजी येथे परतण्यासाठी निघाली. आसिफाबाद ते करंजी हे जवळपास शंभर किलोमीटर अंतर. अशात एकाच्या सायकलची चेन तुटली. काही अंतर गाठतांनाच दुसऱ्याही सायकलची चेन तुटली. मग काय सायकल ढकलत ढकलत ही मंडळी सायंकाळी करंजीत दम टाकत पोहचली.

आसिफाबादवरून हे पाचही लोक गावात येत आहेत, अशी माहिती कळताच सरंपच ज्योती चिचघरे, पोलिस पाटील व अनेक मंडळी गावाच्या प्रवेशद्वारावर आल्या. त्यांनी या पाचही लोकांना तिथेच थांबवले. लागलीच आरोग्य उपकेंद्रातील पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. या पाचही लोकांना होम कारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाला हरविण्यासाठी आपली यंत्रणा सतर्क आहे. अशात लॉकडाउनमुळे कामासाठी शहरात गेलेल्यांना गड्या आपला गाव बरा म्हणण्याची वेळ आली आहे.

करंजीत 103 लोक कॉरन्टाईन
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे साडेतीन हजार लोकसंख्यंचे गाव. गावातील अनेक जण विविध कामानिमीत्त मुंबई, पुणे, नागपूर, बुटीबोरी व अन्य  शहरात कामासाठी गेले होते. पण आता ही सगळी मंडळी गावाकडे परतली आहे. अशा 103 लोकांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. गावात कोरोनाबाबत जनजागृती सुरू आहे.  दवंडीचे काम सुरू असून सॅनीटायझरची फवारणी करण्यात येत आहे. अशा अतिशय संकटपूर्ण काळात तलाठी गैरहजर आहेत.
- ज्योती चिचघरे, सरपंच, करंजी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com