फेरफार नक्कलसाठी फिजिकल डिस्टन्सिंगचा असा उडतोय बोजवारा; यंत्रणेत समन्वयाच्या अभावाचा यांना फटका

शाहीद कुरेशी
Wednesday, 20 May 2020

पीक कर्जासाठी फेरफार प्रमाणपत्र केवळ नवीन शेतकरी कर्जदार यांना आवश्यक असून, इतर नियमित अर्थात जुन्या शेतकर्‍यांना फेरफार नक्कलची गरज नाही.
 

मोताळा (जि.बुलडाणा) : पीक कर्ज वितरणाला गती व सुलभता मिळण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीत विशेष कार्यपद्धती निश्चित केली आहे. असे असताना मोताळा तहसील कार्यालयात फेरफार नक्कलसाठी शेतकर्‍यांची भरउन्हात गर्दी उसळत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. संबंधित यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याने शेतकर्‍यांना याचा फटका बसत असल्याची ओरड शेतकर्‍यांमधून होत आहे. संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पीक कर्जासाठी फेरफार प्रमाणपत्र केवळ नवीन शेतकरी कर्जदार यांना आवश्यक असून, इतर नियमित अर्थात जुन्या शेतकर्‍यांना फेरफार नक्कलची गरज नाही. तसेच सातबारा व नमुना आठ अ मध्ये मागील कर्ज प्रकरणानंतर बदल झाला असल्यास फेरफार नक्कल आवश्यक राहील, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. परंतु याबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

ग्रामीण भागातील शेतकरी फेरफार नक्कलसाठी आर्थिक भुर्दंड सहन करून तहसील कार्यालयाचा उंबरठा झिजवत आहेत. येथील तहसील कार्यालयातील नक्कल विभागासमोर भरउन्हात शेतकरी ताटकळत उभे दिसत आहे. यावेळी अनेकांच्या तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधलेला दिसत नाही. सोबतच फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. 

विशेष म्हणजे टाळेबंदी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पीक कर्ज सुलभीकरणासाठी जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवर पीककर्ज वाटप सुलभीकरण समित्यांची स्थापना केली आहे. परंतु संबंधित यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची ओरड शेतकर्‍यांमधून होत आहे. शेतकर्‍यांची नेमकी बँकेत अडवणूक होत आहे की अजून काही कारण आहे, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सातबारा घरपोच तर फेरफार का नाही?
मोताळा तालुक्यात महसूल प्रशासनाने शेतकर्‍यांना घरपोच सातबारा, नमुना आठ अ वाटप करण्याचा उपक्रम राबविला. त्यासोबतच ज्या शेतकर्‍यांना फेरफार प्रमाणपत्र आवश्यक आहे, त्यांना घरपोच फेरफार नक्कल पोहोचविली असती, तर शेतकर्‍यांना तहसील कार्यालयात चकरा मारण्याची गरज पडली नसती, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे.

सुलभपणे पीक कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील
शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. आज सायंकाळी बँकांच्या प्रतिनिधींची मीटिंग घेण्यात येणार आहे. शेतकर्‍यांची गर्दी टाळून त्यांना सुलभपणे पीक कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- व्ही. एस. कुमरे, तहसीलदार, मोताळा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of coordination in the system is a blow to the farmers in buldana district