
पर्यावरणाची होणारी हानी व एकूणच भीषण परिस्थितीमुळे त्याचा परिणाम भूजल पातळी घटण्यात होत आहे. भौगोलिक वैविध्य संपन्न गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जरी भरपूर असले तरी बहुतांश पाऊस हा पावसाळ्यात होत असून पाणी साठवून ठेवण्याचे व जिरवण्याच्या प्रकल्पांचा अभाव आहे.
भामरागड (जि. गडचिरोली) : दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड व एकूणच होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे पर्यावरण रक्षणासाठी जलसंवर्धन आवश्यक आहे. हीच बाब हेरून येथील लाहेरी पोलिस ठाण्यात आरओच्या वेस्टेज वॉटरचा वापर करून वृक्षांचे संगोपन करण्यात येत आहे. पोलिस ठाण्याच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरणाची होणारी हानी व एकूणच भीषण परिस्थितीमुळे त्याचा परिणाम भूजल पातळी घटण्यात होत आहे. भौगोलिक वैविध्य संपन्न गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जरी भरपूर असले तरी बहुतांश पाऊस हा पावसाळ्यात होत असून पाणी साठवून ठेवण्याचे व जिरवण्याच्या प्रकल्पांचा अभाव आहे. पाणी वाहून जाण्याचा अतिवेग असल्यामुळेच पाणी वाहून जाण्याचे प्रमाणदेखील या जिल्ह्यात अधिक आहे. त्यात यावर्षी जानेवारी महिना जसा जसा सरू लागला आहे, तशी उन्हाची तीव्रता वाढत आहे व पाण्याची निकड मनुष्य, पशू, पक्षी यांनाच नाही तर वृक्षांनासुद्धा जाणवू लागली आहे.
नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं
एरवी सामाजिक बांधिलकी जपणारे, लोकाभिमुख शासनासाठी आवश्यक कर्तव्य निर्वहन करणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी पर्यावरणाबाबत दाखवलेली आस्था नक्कीच प्रशंसनीय म्हणावी अशी आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, भामरागड पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर, इतर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी टाकाऊपासून टिकाऊ म्हणावा असाच एक उपक्रम सुरू केला आहे.
निरुपयोगी ठरलेले पाइपचे तुकडे जोडून उप पोलिस ठाण्यातील आरओ प्लांटच्या वेस्टेज वॉटरचा वापर करून ठिबक सदृश सिंचन प्रणाली विकसित करून झाडांना पाणी देण्याची सोय केली आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर झालीच शिवाय उन्हाळ्यात झाडांनादेखील पाण्याचा एक प्रकारे कृत्रिम पण शाश्वत स्रोत उपलब्ध करून दिला आहे. यातून लाहेरी पोलिसांनी पर्यावरणाबद्दल पोलिसांचे असलेले प्रेम व बांधिलकी दाखवून दिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जल हेच जीवन...
वाढत्या प्रदूषणाच्या आजच्या युगात जल हेच जीवन आहे. निसर्ग मोफत देत असलेल्या पाण्याचा गैरवापर न करता जलसंवर्धनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे लाहेरी पोलिस ठाण्याने सुरू केलेला हा उपक्रम इतर अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ