तीन महिन्यांपासून ‘लालपरी’चे शिलेदार वेतनाच्या प्रतीक्षेत, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण

सुधीर भारती
Sunday, 20 September 2020

शासनाने एसटी वाहतुकीला हिरवी झेंडी दिल्याने चालक, वाहकांसोबतच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारीसुद्धा कामावर रुजू झालेत. परंतु मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगारच देण्यात आलेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

अमरावती : प्रवाशांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, खेडी, दुर्गम गावांना एकमेकांशी जोडणारी लालपरी म्हणजेच एसटीच्या शिलेदारांना सध्या "बुरे दिन' आले आहेत. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजाविणाऱ्या एसटी कामगारांना मागील तीन महिन्यांपासून वेतनासाठी चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने आता पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने वाहक व चालकांचे काम आता अधिक वाढले आहे.

 

कोरोनाच्या काळात विविध अडचणींना सामोरे जात असताना एसटी कामगारांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना व लॉकडाउनच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवरसुद्धा पाठविण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून शासनाने एसटी वाहतुकीला हिरवी झेंडी दिल्याने चालक, वाहकांसोबतच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारीसुद्धा कामावर रुजू झालेत. परंतु मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगारच देण्यात आलेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

कुटुंबाचे आरोग्य, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न

कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे शिक्षण याबाबींवर खर्च कसा करावा, असा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे. आता शासनाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार चालकवाहक, कोरोनाच्या काळातही जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावीत आहेत, मात्र त्यांना आता आपल्या हक्काच्या वेतनाची प्रतीक्षा आहे.

 

जाणून घ्या : व्वा व्वा! वरुडची संत्री जाणार बांगलादेशाला

नियमितपणे वेतन मिळावे
एसटीचे कर्मचारी अतिशय धोकादायक परिस्थितीत काम करीत आहेत. त्यांच्यावर कुटुंबाचा भार असतो. अशा स्थितीत नियमितपणे वेतन मिळणे गरजेचे आहे. मात्र तीन महिन्यांचा पगार न दिल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे.
-एस. के. शर्मा, विभागीय कार्याध्यक्ष, एसटी कामगार सेना.

खर्च कोठून भागवावा
वेतन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक आरोग्य अशा कारणांसाठी पैशांची गरज असते, मात्र पगारच नसल्याने हा खर्च कोठून भागवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- शीतल मोहोड, वाहक, निर्भया प्रमुख, अमरावती आगार.

अवश्य वाचा : क्या बात है! अमिताभने तयार केले खराब लसणापासून सेंद्रिय खत आणि कीटकनाशक; यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार

कामगारांना आर्थिक संकटांचा सामना
एसटीचे कर्मचारी अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावीत आहेत. किमान वेळेवर वेतन मिळणे ही रास्त अपेक्षा आहे. मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
-जयसिंग चव्हाण, आगार अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalpari employees have been waiting for their salaries for three months