अखेर अर्ज, विनंतीला आले यश! सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ते 55 विद्यार्थी परतणार घरी

keral
keral

यवतमाळ  : अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटाने लोक परदेशात, परप्रांतात अडकले. त्यात अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
 कोरोनामुळे 24 मार्चला देशात अचानक ’लॉकडाउन’ झाले. त्यात महाराष्ट्रातील 55 विद्यार्थी केरळमध्ये अडकले होते. मदतीसाठी त्यांनी अनेकांकडे याचना केली. मात्र, कोणीही सरसावले नाही. अखेर या विद्यार्थ्यांच्या मदतीला राहुल बिग्रेड धावून आली. त्यांनी दोन लक्झरी बसेसची व्यवस्था करून दिली. तसेच त्या विद्यार्थ्यांचे पासेस व आरोग्य तपासणीही करून घेतली. मंगळवारी (ता. 12) रात्री सातदरम्यान हे सर्व विद्यार्थी एर्नाक्युलम येथून लक्झरी बसने महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले आहेत. बसमध्ये बसताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता, असे राहुल बिग्रेडचे राजू नायर यांनी ’सकाळ’शी बोलताना सांगितले.
 महाराष्ट्रातील 55 आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची साऊथर्न रेल्वे तिरुअनंतपुरम डिव्हिजनमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून एक वर्षापूर्वी निवड झाली होती. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन मुली, भुसावळ येथील दोन मुली, एक तेलंगणातील आणि जळगाव, खानदेशासह महाराष्ट्रातील 55 मुलांचा समावेश होता. त्यांचे प्रशिक्षण 13 एप्रिललाच संपले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात आपल्या गावी परत यायचे होते. परंतु, दरम्यानच्या काळात कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दुसरे ’लॉकडाउन’ जाहीर केले. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी केरळमध्येच अडकून पडले होते. त्यांनी गावी येण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडून दाद मिळाली नाही. अखेर त्यांनी आपल्या भागातील मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क केला. परंतु, त्या सर्वांनी हो बघतो एवढेच उत्तर दिले. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले, स्थानिक आमदार, मंत्री यांना फोन लावले. सर्वांनी हो, बघतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो, अशीच आश्‍वासने दिली. अखेर, दैनिक सकाळने या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यांची व्यथा समजून घेतली. शासकीय, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. मात्र, कोणाकडूनच सकारात्मक उत्तर आले नाही. अखेर, यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. चेतन दरणे यांना याबाबत सांगितले. त्यांनी राहुल ब्रिगेडच्या एर्नाक्युलम येथील सचिन राव व राजू नायर या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राहुल ब्रिगेड अखेर त्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली. राजू नायर यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यांची यादी केली. त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. त्या त्या जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधून एर्नाक्युलमच्या जिल्हाधिकार्‍यांकडून प्रवासासाठी ई-पास तयार करून घेतल्या. त्या विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी दोन लक्झरी बसेसची व्यवस्थासुद्धा करून दिली. हे सर्व विद्यार्थी मंगळवारी (ता. 12) रात्री सात वाजता एर्नाक्युलम येथून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान भोजनाची व्यवस्था काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. हे सर्व विद्यार्थी गुरुवारी (ता. 14) संध्याकाळपर्यंत अकोला आणि जळगाव येथे पोहोचणार आहेत. तेथून हे विद्यार्थी वेगवेगळ्या वाहनाने आपापल्या गावी जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. सोशल डिटन्सिंगसुद्धा प्रवासादरम्यान पाळले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
  प्रवासात गैरसोय नाही
 आम्ही सध्या प्रवासात असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत अकोला येथे पोहोचणार आहोत. बंगळुरू येथे राहुल बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी  आमच्या भोजनाची व्यवस्था केली. प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. आज चित्रकुट येथेही राहुल बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली.’
तनया कापडे,
सिद्धेश्‍वरनगर चौसाळा रोड, यवतमाळ

सविस्तर वाचा - गर्भवती मातांना सारीसह कोरोनाचा धोका, अशी घ्यावी काळजी
 विद्यार्थ्यांना सहकार्य
केरळमध्ये अडकलेल्या यवतमाळातील दोन मुलींनी माझ्याशी संवाद साधला. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की गेल्या 15 दिवसांपासून त्या सतत प्रशासन व नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे मी एर्नाक्युलम येथील राहुल बिग्रेडचे कार्यकर्ते सचिन राव व राजू नायर यांना सांगितले. त्यांनी सर्व अडथळे दूर करीत शासकीय नियमांचे पालन करीत त्या विद्यार्थ्यांना सहकार्य केले. ते सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून त्यांची प्रवासादरम्यान सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.’
डॉ. चेतन दरणे,
दंतचिकित्सक, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com