Video : गर्भवती मातांना सारीसह कोरोनाचा धोका, अशी घ्यावी काळजी...

Risk of corona with sari to pregnant mothers
Risk of corona with sari to pregnant mothers

नागपूर : देशात दर शंभर गर्भवती महिलांपैकी 15 ते 20 गर्भवती महिला प्रसूतीपूर्व ताण आणि नैराश्‍याने ग्रस्त असतात. यामध्ये कुटुंबीयांचा पाठिंबा नसणं, नको असलेली गर्भधारणा, लोहाचं अपुरे प्रमाण अशा विविध कारणांनी गर्भारपणात ताण आणि नैराश्‍य येऊ शकतं. त्यात कोरोनाचे संकट आले. कोरोनामुळे गर्भवतींवर मानसिक ताण वाढला असून, उपराजधानीत दोन महिन्यांत मेयो-मेडिकलमध्ये डझनभर गर्भवती मातांना सारीसह कोरोनाची लागण झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आले.

ही बाब चिंताजनक असली तरी योग्य वेळी प्रसूतीरोग विभागातील तज्ज्ञांसह मानसोपचार मिळाले तर गर्भवती महिला नैराश्‍यातून बाहेर आणण्यास मदत होते. महापालिकेच्या नोंदीनुसार उपराजधानीत सध्या पाच हजार चारशे गर्भवती माता असल्याची नोंद आहे.

या पार्श्‍वभूमीवर स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ डॉ. कांचन गोलावार म्हणाल्या, गर्भवती मातांनी घरीच स्वतःला विलगीकरण करून घ्यावे, अर्थात इतरांपासून घरातच वेगळे राहावे. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर द्यावा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अथवा त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खात्रीलायक उपचार नाहीत. परंतु, या काळात गर्भवती मातांनी स्वतःच आपली सुरक्षा करायची आहे. वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि वेळीच वैद्यकीय उपचार घेणे यातूनच कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यात यश येते असल्याचे त्यांनी सांगितले.

ताप, खोकला, सर्दी, श्‍वास घेण्यास त्रास होणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. याच्या पुढची पायरी म्हणजे न्यूमोनियाची गंभीर स्थिती सारी हा आजार होऊ शकतो. राज्यात सारीसह कोरोनाचा विळख्यात अडकलेल्या महिलांची संख्या शतकाजवळ पोहोचल्याची शक्‍यता एका अधिकाऱ्याने वर्तविली आहे. गर्भवती महिलांचे समुपदेशन आवश्‍यक आहे, असे सांगत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक तसेच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले, गर्भवती मातांमध्ये नैराश्‍य येण्यामागील अनेक कारणं असतात. यात शारीरिक, मानसिक आणि आनुवंशिक कारणंही असू शकतात.

महिलेच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर अशा महिलांमध्ये नैराश्‍य दिसून येतं. मानसिकरीत्या नैराश्‍य येण्याचं कारण म्हणजे पहिली मुलगी असेल तर आता मुलगा होईल का? अशी चिंता महिलांमध्ये असते. ज्या महिलांच्या कुटुंबात एखाद्याला कोरोनाबाधित आढळून आला तर डिप्रेशन येऊ शकते.

समुपदेशनाच्या माध्यमातून बाहेर काढणे सोपे
सध्या कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात तीन प्रकारच्या अवस्थांमधून जाणारे अनुभव येत आहेत. गर्भवती मातांसह इतरही व्यक्तींना आम्हालाही कोरोना होऊ शकतो, अशी भीती मनात बाळगून असणारे लोकं पहिल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तर लॉकडाउनच्या रूपाने नवीन परिस्थितीत अडकल्यामुळे ताण येऊन नैराश्‍यात जाण्याची भीती आहे. एखाद्याच्या घरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्या घरी गर्भवती माता असल्यास तिच्या मनावर आघात होण्याची भीती आहे. अशा गर्भवती महिला मानसोपचारतज्ज्ञांकडे आल्यास समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना यातून बाहेर काढणं सोपं होतं
-डॉ. प्रवीण नवखरे, प्रादेशिक मनोरुग्णालय, वैद्यकीय उपअधीक्षक, नागपूर

छंद जोपासा, वाचन करा
कोरोनामुळे मानसिक दडपण येऊन गर्भवती मातांमध्ये उच्च रक्तदाब वाढू शकतो. तसाही गर्भवती मातांचा रक्तदाब हा छुपा शत्रू आहे. उच्च रक्तदाब, दमा असलेल्या गर्भवती मातांनी कोरोनाच्या या लॉकडाउनमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गर्दी टाळावी. तणावमुक्त राहण्यासाठी छंद, वाचन करावे.
-डॉ. कांचन गोलावार, स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ, मेडिकल, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com