पुनर्मिलनात आईने लेकरांना कुरवाळले; दिवसभर झाली होती पोरकी 

leopard.
leopard.

गिरड (जि. वर्धा) : लेकरांवाचून आईचे काळीज किती दुभंगले जाते, हे मायमाऊलीला ठाऊक. ती मानव असो वा प्राणी. दोघांचीही अवस्था सारखीच. हाच प्रत्यय मादी बिबट आणि तिच्या पिलांच्या पुनर्मिलनातून साऱ्यांनाच आला. पिलांपासून दुरावलेल्या या मातेच्या जवळ तिची पिलं पोहोचताच त्यांना कुरवाळण्यापासून ती स्वत:ला रोखू शकली नाही. 

धामणगाव (गाठे) येथे शैलेश चौधरी यांच्या शेतालगत नालीतील गुहेत एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला. या पिलांच्या सुरक्षेकरिता ही मादी बिबट गुफेतच थांबली होती. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने तारखांब उभारण्याचे काम सुरू केले. खड्डे खोदण्याकरिता प्रहार करताच गुहेत असलेली बिबट ओरडली. डरकाळी कानी येताच शेतकरी पळाले. याच काळात ती बिबट मादीही बाहेर पडली. तिच्या मागे पिलेही आली. यावेळी उपस्थित काही मजुरांनी या पिलांना गोंजारले. शेतमजुरांची गर्दी होताच मादा बिबट पिलांपासून दुरावली. ही घटना धामणगाव (गाठे) शिवारात घडली. 

घटनेची माहिती शेतकऱ्यांनी मंगळरूळ सहवन परिक्षेत्र अधिकारी नरडंगे यांना सांगितली. दरम्यान वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिलांना गुहेत सुरक्षित ठेवले. या ठिकाणावर कॅमेरा लावून कर्मचाऱ्यांची पाळत ठेवली. सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास पिलांची आई तेथे आली. तिने आपल्या पिलांना मायेने कुरवाळत जंगलातील दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. 

या घटनेसंदर्भात धामणगाव येथील शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळ गाठून घटनेची पाहणी केली. पिलं सुरक्षित गुहेत राहावे यासाठी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह गस्तीवर होतो. कॅमेराच्या साहाय्याने बिबट मादीच्या आणि पिलांच्या हालचालींवर लक्ष होते. सायंकाळी 7.30 वाजता बिबट सुरक्षित स्थळी पिलांना घेऊन गेली. या परिसरात नियमित गस्त सुरू आहे. 
- एस. एन. नरडंगे, 
सहायक वनक्षेत्र अधिकारी, मंगरूळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com