...अन् बिबट्या पुन्हा अवतरला, शेतकऱ्यांचा उडाला थरकाप; वाचा सविस्तर

शाहीद कुरेशी
Tuesday, 14 April 2020

शेतात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

मोताळा (जि.बुलडाणा) : तालुक्यातील काबरखेड नजीकच्या दूधमाळ शिवारात वासराची शिकार करणारा बिबट्या रविवारी रात्री पुन्हा घटनास्थळी अवतरला. दरम्यान, बिबट्याचे दर्शन घडताच परिसरातील शेतकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून आला.

तालुक्यातील काबरखेड येथील शेतकरी सतीश मुरलीधर मापारी यांच्या दूधमाळ शिवारातील शेतात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदर बिबट्या रात्री पुन्हा उर्वरित शिकार खाण्यासाठी घटनास्थळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तिकडे जाऊ नये, अशा सूचना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना दिल्या होत्या. 

आवश्यक वाचा - भिमराया...घे तुला ही महाकाव्याची वंदना

परंतु वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नव्हती, असे नागरिकांनी सांगितले. सध्या कोरोनाचे संकट व शेतीच्या कामानिमित्त काही शेतकरी शेतशिवारात वास्तव्याला आहेत. दरम्यान, रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सदर बिबट्याने उर्वरित शिकार खाण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मृत वासराला घेऊन जाणाऱ्या बिबट्याचे परिसरातील काही शेतकऱ्यांना दर्शन घडले.  

अचानक बिबट्याला पाहून या शेतकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने शेतशिवारात पळ काढला. ही वार्ता लगेच काबरखेड गावात पोहोचली. दरम्यान, सरपंच पती दादाराव पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. परंतु वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

...तर बिबट्या झाला असता जेरबंद?
काही दिवसांपूर्वी मोताळा शहरासह आजूबाजूच्या अनेक गावात बिबट्याची दहशत पसरली होती. तालुक्यातील पान्हेरा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना 6 एप्रिलला उघडकीस आली. तर, दूधमाळ शिवारात वासराचा फडशा पाडल्याचे रविवारी समोर आले. वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावला असता, तर सदर बिबट्याला जेरबंद करता आले असते, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. परंतु वनविभागाने काहीच उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

बिबट्याची दहशत कायम
मागील काही दिवसांपासून मोताळा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. अलीकडे पुन्हई येथील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता. रिधोरा जहांगीर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली गाय दगावली होती. मोताळा शहरासह आजूबाजूच्या अनेक गावात बिबट्या मुक्त संचार करताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. आता पान्हेरा व काबरखेड परिसरात बिबट्याने पशुधनावर निशाना साधला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard is come again in motala