भिमराया...घे तुला ही महाकाव्याची वंदना!

ambedkar.jpg
ambedkar.jpg

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध करण्याचा संकल्प जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाकाव्याच्या पहिल्या खंडात एक हजार कवितांचा संग्रह संपादनासह तयार झाला आहे. त्याच्या दोन प्रती तयार असून १४ एप्रिलरोजी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सदर खंड महामानवाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. 

आपल्याला जागतिक स्तरावर महाकाव्य म्हणून काही मोजकी पुस्तकेच ज्ञात आहेत. परंतु आधुनिक काळात महाकाव्य प्रसिद्ध झाले असे क्वचितच घडले आहे. तेही एकाच व्यक्तीच्या जीवन आणि कार्यावर असे महाकाव्य प्रसिद्ध होणे हा दुर्मिळ योग आहे. हा योग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पाच हजार कवितांचा समावेश असणारे ‘समतेचे महाकाव्य’ पाच खंडात प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला आहे. सदर महाकाव्यातील पहिला खंड तयार झाला असून डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रथम खंडाच्या दोन प्रती महामानवाला अर्पण करण्यात येतील. समतेचे महाकाव्य साकार करण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे व उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहेत. 

असा आहे पहिला खंड

  • समतेच्या महाकाव्याच्या पहिल्या खंडामध्ये 181 कवींनी लिहिलेल्या प्रत्येकी दोन कविता अशा मिळून 362 कविता आणि 638 कवींनी लिहिलेली प्रत्येकी एक कविता अशा मिळून एक हजार कविता आहेत. 
  • जगात आजवर कोणत्याही एका महापुरुषांवर एक हजार कविता एकाच वेळी प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ‘समतेचे महाकाव्य’ छापिल स्वरूपात जरी पाच हजार कवितांचे असणार आहे तरी त्याच्या पहिल्याच खंडाने विश्वविक्रम साधलेला आहे. 
  • महाकाव्याकरिता सर्व स्तरातील कवींनी कविता लिहिलेल्या आहेत. डॉक्टरेट प्राप्त उच्चशिक्षित प्राध्यापकांनी कविता लिहिल्यात. त्याच वेळी शेतात राबणाऱ्या मजुरांनीदेखील कविता लिहिलेल्या आहेत. विद्यार्थी,स्त्री-पुरुष, कष्टकरी, शेतकरी, उच्चशिक्षित अशा सर्वांनी कविता लिहिलेल्या आहेत. 
  • चंद्रपूरमधील वरोऱ्याचे नीरज आत्राम, बुलडाण्याचे नजीम खान, मुंबईच्या डॉ. रत्ना पानवेकर, ते चक्क अमेरिकेतील पल्लवी माने यांनी महाकाव्याकरिता कविता रचल्या आहेत. गोव्यातूनदेखील कविता प्राप्त झाल्या आहेत. 
  • समतेच्या  महाकाव्याकरिता काम करणाऱ्या चमूने अक्षरशः तहान-भूक विसरून रात्रीचे दोन वाजेपर्यंत जागून महाकाव्य आकाराला आणले आहे. 
  • समतेच्या महाकाव्याचे दरवर्षी 14 एप्रिलला एक खंड याप्रमाणे पाच खंड निघणार आहेत. समतेचे महाकाव्य ग्रंथामध्ये पहिल्या खंडातच एक हजार कविता आहेत. साधारणतः 15 हजार काव्यओळी आहेत.
  • भारतीय महाकाव्यांचा विचार करता रामायण या महाकाव्यानंतर ‘समतेचे महाकाव्य’ हे एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलेले दुसरे महाकाव्य ठरणार आहे.

समतेचे महाकाव्य मोबाईल ॲप तयार
डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी ‘समतेचे महाकाव्य’ मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. ॲपवर बाबासाहेबांना मानवंदना देणाऱ्या एक लक्ष कविता गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. एका कवितेमध्ये किमान पाच कडवी अर्थात दहा ओळी असतात. म्हणजेच समतेच्या महाकाव्यामध्ये किमान दहा लाख ओळी असतील. 

114 ठिकाणी प्रकाशन
डॉ. बाबासाहेबांचा जेथे-जेथे पदस्पर्श झाला अशा प्रमुख 114 ठिकाणी 14 एप्रिल रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका ग्रंथाचे, एकाच दिवशी, एकाच वेळी 114 ठिकाणावरुन प्रकाशन ही बाब देखील विश्वविक्रम घडविणार आहे. तथापि सध्याची परिस्थिती पाहता हा प्रकाशनाचा कार्यक्रम आता नंतर होणार आहे. तरीही 114 ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी या ग्रंथाचे प्रकाशन होणार हे मात्र निश्चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com