मानवी संरक्षणासाठी लावले होते तारेचे कुंपण, अडकला मात्र बिबट आणि....

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

गराडा गावाजवळील जंगल परिसरात असलेल्या लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी शेताच्या भोवताली तारांचे कुंपण लावलेले आहे. याच तारांच्या कुंपणात  बिबट फास लागून  मृतावस्थेत आढळून आला आहे.

गोरेगाव (जि. गोंदिया) :  जंगलानजिकच्या शेतामध्ये वन्यप्राण्यांचा वावर ही नित्याचीच बाब आहे. त्यापासून वाचण्यासाठी शेतकरी शेताभोवती कुंपण घालतात. मात्र त्यात अडकून नाहक एका बिबट्याचा जीव गेल्याची घटना नुकतीच घडली.
गोंदिया वनविभागातील वनपरिक्षेत्र गोरेगाव  येथे येणाऱ्या मुंडीपार बिट अंतर्गत गराडा गावानजिक असलेल्या कक्ष क्रमांक ४३९ संरक्षित वन येथे लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या मालकीच्या शेतजमिनीत लावलेल्या तारांच्या कुंपणात शनिवारी (ता२३) सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बिबट्या फास लागून ठार झाल्याची घटना प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेचा तपास सहायक वनसंरक्षक आर आर सतगीर, वनपरीक्षेत्रधिकारी प्रविण साठवणे यांनी केला आहे.
 गराडा गावाजवळील जंगल परिसरात असलेल्या लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी शेताच्या भोवताली तारांचे कुंपण लावलेले आहे. याच तारांच्या कुंपणात  बिबट फास लागून  मृतावस्थेत आढळून आला आहे.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ
    या  बिबट्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली असता घटनास्थळी पशु वैद्यकीय अधिकारी सी डी मालापुरे, सहाय्यक एस डब्लु राऊत यांनी म्रुत बिबट्याचे शवविच्छेदन केले. दफनविधी मुरदोली येथील वन परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दीपक परमार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्रधिकारी प्रविण साठवणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard got killed being stuck in fencing