
काहीवेळ बिबट वनविभागाच्या कार्यालयासमोर फिरत होता. गावातील संदीप मडावी यांच्या कोंबड्यावर त्याने ताव मारला. गावकरी हळूहळू वाढू लागले. त्यांनी बिबट्याला गावाबाहेर हाकलण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, बिबट बाहेर जाण्याऐवजी गावातच शिरला.
नागभीड (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील देवपायली गावात गुरुवारी पहाटेच बिबट्याने प्रवेश केला. गावातील एकाच्या प्रसाधनगृहातच त्याने ठाण मांडले. गावात बिबट शिरल्याने त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाने तातडीने गाव गाठून बिबट्याला जेरबंद केले.
नागभीड तालुक्यातील देवपायली, सोनुर्ली, नवानगर ही गावे जंगलाला लागूनच आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात एका बिबट्याने ठाण मांडले होते. परिसरातील अनेकांच्या कोंबड्या, शेळ्या बिबट्याने फस्त केल्या.
गुरुवारी (ता. २१) सकाळी बिबट्याने गावात प्रवेश केला. सकाळची वेळ असल्याने काहीजण साखरझोपेत, तर काही जण प्रातःविधीकरिता बाहेर गेले होते. महिला घरासमोर साफसफाईची कामे करीत होत्या. तेव्हाच गावात बिबट्याने प्रवेश केला.
काहीवेळ बिबट वनविभागाच्या कार्यालयासमोर फिरत होता. गावातील संदीप मडावी यांच्या कोंबड्यावर त्याने ताव मारला. गावकरी हळूहळू वाढू लागले. त्यांनी बिबट्याला गावाबाहेर हाकलण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, बिबट बाहेर जाण्याऐवजी गावातच शिरला. गावातील स्वप्नील मासुरकर हा मोकळ्या जागेवर बकरी बांधत होता. त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर बिबट प्रसाधनगृहात जाऊन दडला.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी गुडन्यज! कृषिसल्ला मिळणार आता मोबाईलवर
बिबट प्रसानगृहात शिरल्याची माहिती तळोधी परिक्षेत्राचे क्षेत्र सहायक के. डी. गरमडे यांना देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात वनरक्षक एस. बी. चौधरी, एन. डी. पेंदाम आणि अन्य कर्मचारी देवपायली बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आले. त्यानंतर तीन-चार तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)