"दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' प्रपंचाचा गाडा चालविण्यासाठी शिपाई झाला फेरीवाला

 सायकलवरून वस्तू विकण्यासाठी नेताना हिरामण तलमले.
सायकलवरून वस्तू विकण्यासाठी नेताना हिरामण तलमले.

पवनी, (जि. भंडारा) :  माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाला मेहनत व धडपड ही करावीच लागते. फरक एवढाच की, कोणाच्या वाटेला ती कमी येते; तर कोणाला आयुष्यभर राबल्याशिवाय, संघर्ष केल्यावाचून गत्यंतर नसते. मात्र, कधी कोणासमोर हात पसरण्यापेक्षा कष्टाची व प्रामाणिकपणाची भाकरी गोड मानून ते तृप्त व समाधानी असतात. असाच अनुभव गेल्या 25 वर्षांपासून वाचनालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या हिरामण तलमले यांच्याबाबत आहे. तुटपुंज्या वेतनात भागत नसल्याने प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी सायकलवर छोटेखानी दुकान थाटून ते ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.

हिरामण तलमले हे शहरातील बेलघाटा वॉर्डात राहतात. मागील 25 वर्षांपासून ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात शिपाई म्हणून काम करतात. 200 रुपयांपासून सुरू झालेला वेतनाचा प्रवास अडीच हजारांवर येऊन ठेपला. महागाईच्या काळात तोकड्या कमाईत भागणार कसे म्हणून त्यांनी जोडधंदा सुरू केला. गृहोपयोगी साहित्य कॅरेटमध्ये मांडून गावोगावी सायकलने विक्री करतात.

कामाची त्यांनी लाज बाळगली नाही. "दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' जगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण, रंक आणखी राव, माळ यशाची हासत घालू, हासत, हासत तसेच झेलू पराजयाचे घाव, "याला जीवन ऐसे नाव' संपूर्ण जीवनाची व्याख्या सांगून जाणाऱ्या या समर्पक ओळी. या व्यक्तीला तंतोतंत लागू होणाऱ्या आहेत. आपले वय, आपली नोकरी सांभाळून कोणताही संकुचितपणा न बाळगता पोटासाठी इमाने, इतबारे राबणारे हे व्यक्तिमत्त्व परिसरातील गावखेड्यांत साऱ्यांच्या परिचयाचे आहे.

गेल्या 10-12 वर्षांपासून चिमटे, भांडी घासण्याचा ब्रश, फिनाईल, मेंदी, गाळणी अशा नित्योपयोगी वस्तू त्यांच्या कॅरेटमध्ये असतात. सुरुवातीला ते मंजन विकायचे; परंतु नफा मिळत नसल्याने वस्तूंची विक्री सुरू केली. सायकलच्या हॅण्डलला वस्तू अडकवून व कॅरिअरवर कॅरेट घेऊन हिरामण काका गावात, वस्तीत पोहोचून वस्तू विकतात. लॉकडाउनमध्ये वाचनालय बंद असल्याने त्यांना आता या कामासाठी बराच वेळ मिळतो. भरउन्हाळ्यातही घामाघूम होत पोटासाठी त्यांची भटकंती सुरू असते.

उतारवयामुळे त्रास वाढला
कधी पायी तर कधी सायकलने प्रवास करून वस्तू विकणाऱ्या हिरामण काकांना आता उतारवयामुळे गुडघे दुखण्याचा त्रास होतो. पायडल मारताना पाय दुखतात. पण, आपल्या व्यथा सांगणार कोणाला. शरीराला होणाऱ्या वेदनांपेक्षा पोटाची भूक ही जास्त दाहक असते. कधी कधी दिवसभर फिरूनही कधी 200 रुपयांचा व्यवसाय होत नाही. वेळेवर जेवण होत नसल्याने नाश्‍त्यावर काम भागवावे लागते. परंतु, मृदू व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अनेक ग्राहक जोडले आहेत. कामाची लाज बाळगू नये. कोणासमोर हात पसरण्यापेक्षा हे काम स्वाभिमानाचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.


पंचवीस वर्षांपासून वाचनालयात काम करतो. पण, तुटपुंज्या मानधनात संसाराचे चाक चालत नव्हते. त्यामुळे पोटापाण्यासाठी हा फिरता व्यवसाय सुरू केला. कोणाची लाचारी पत्करण्यापेक्षा अंगात शक्ती आहे तोवर हे काम करतो आहे. यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही.
हिरामण तलमले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com