मध्यरात्री शहरात विजांचे तांडव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. सायंकाळी काही भागांत जोरदार सरी बरसल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले. पाहता पाहता विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास तास ते दीड तासभर शहरातील सर्वच भागांमध्ये धो-धो बरसला.

नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. सायंकाळी काही भागांत जोरदार सरी बरसल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून आले. पाहता पाहता विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास तास ते दीड तासभर शहरातील सर्वच भागांमध्ये धो-धो बरसला. यावेळी नागपूरकरांना अक्षरश: हृदयात धडकी भरविणाऱ्या विद्युल्लतांचा खेळ आकाशात पाहायला व अनुभवायला मिळाला. कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या कडकडाटांमुळे अनेकांची झोप उडाली. मध्यरात्रीनंतरही बराच वेळपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. ठिकठिकाणी खोलगट भागांमध्ये कुठे गुडघाभर, तर कुठे मांडीभर पाणी साचले होते. खुल्या मैदानांमध्येही पाणीच पाणी दिसत होते. नाग व पिवळ्या नदीसह नालेही तुडुंब भरून वाहिले. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या. सकाळी साडेआठपर्यंत शहरात 48.7 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने गुरुवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. सायंकाळ व मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे फुटाळापाठोपाठ अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. "ओव्हरफ्लो'चा आनंद घेण्यासाठी अंबाझरीवर रात्रीपासूनच नागपूरकरांनी गर्दी केली होती. सकाळीही अनेकांनी कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबत अंबाझरी परिसराचा फेरफटका मारून "ओव्हरफ्लो'चा आनंद घेतला. यंदा हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडूनही आणि पावसाळा संपायला येऊनही अद्याप अंबाझरी "ओव्हरफ्लो' झाला नव्हता. उशिरा का होईना तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने आता नागपूरकरांना खऱ्या अर्थाने दमदार पावसाळा झाल्याचे समाधान वाटत आहे. गेल्या वर्षी 21 ऑगस्टला अंबाझरी "ओव्हरफ्लो' झाला होता, हे उल्लेखनीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightning strikes the city at midnight