गोंदियात शहरवासींचा जीव धोक्यात...काय असावे कारण...वाचा सविस्तर

मुनेश्‍वर कुकडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले असले; तरी दररोज शहरातील रस्त्यांवर, बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होताना दिसत नाही. दुचाकी वाहनावर दोन व्यक्तींना परवानगी देण्यात आली असली; तरी ट्रिपल सीट दुचाकीवर बसणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. बाधित रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ जिल्हा प्रशासनासह जिल्हावासींच्या चिंतेत भर टाकणारी आहे

गोंदिया : शहरासह जिल्हाभरात लॉकडाउनमध्ये शिथिलता आहे. याचाच फायदा घेत आनंदाच्या भरात नागरिक रस्तोरस्ती बिनधास्त फिरत आहेत. बाजारातही मोठी गर्दी करीत आहेत. परिणामी, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

गुरुवारी (ता.30) एकाच दिवशी 13 रुग्ण बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे, मास्क वापरूनच बाहेर पडा, असा सल्ला प्रशासनाने दिला असला; तरी वाहनचालक विनामास्क सुसाट पळत असल्याचे चित्र दिसते.

जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिल्या बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे प्रशासनासह नागरिकदेखील सतर्क झाले. आवश्‍यक असेल तरच नागरिक बाहेर पडत होते. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे चांगले पाऊल तीन-चार महिन्यांपूर्वी जिल्हावासींनी उचलले होते. त्यामुळे बाधित रुग्णसंख्येला आळा बसला होता. परंतु, नंतर बाहेर गावाहून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत येणाऱ्या लोकांनी चिंता वाढविली. भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दोनदा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता

दरम्यान, मध्यंतरी शासनाने कठोर भूमिका घेत दंडात्मक कारवाईचा दंडुका उगारल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचे पाऊल विनाकारण जिल्ह्यात पडत नव्हते. याचाच परिणाम म्हणून दोनदा जिल्हा कोरोनामुक्त झाला. मात्र, अनलॉक- 01 सुरू झाल्यापासून आणि लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यापासून शहरासह जिल्ह्यातील नागरिक ‘सुटलो बुवा़' या आविर्भावात रस्तोरस्ती फिरत आहेत. आवश्‍यक कामानिमित्तच बाहेर पडा, असे प्रशासनाचे निर्देश असले तरी, याकडे कोणाचेही लक्ष नाही.

बाजारपेठा हाउसफुल्ल; धोका वाढला

दररोज शहरातील रस्त्यांवर, बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होताना दिसत नाही. दुचाकी वाहनावर दोन व्यक्तींना परवानगी देण्यात आली असली; तरी ट्रिपल सीट दुचाकीवर बसणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. काही दुचाकीचालक तरुण एवढ्यावरच थांबत नाहीत, तर विना मास्क सुसाट वाहने पळवीत असतात. अनलॉकचा गैरफायदा नागरिकांनी घेतल्याचे दिसून येत असून, बाधित रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ जिल्हा प्रशासनासह जिल्हावासींच्या चिंतेत भर टाकणारी आहे. दरम्यान, प्रशासनाने लादून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

जाणून घ्या : सिहोऱ्यात वाढला कोरोना आता दर शनिवारी जनता कर्फ्यू !

आस्थापनांतून सॅनिटायझर गायब

महत्‌प्रयासाने आस्थापना सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी एक नियमावली तयार केली. सोशल डिस्टन्सिंग असण्याबरोबरच सॅनिटायझर आस्थापनाच्या ठिकाणी असावे, कामानिमित्त आलेल्या नागरिकांची नोंद त्यांच्या मोबाईल क्रमांकासह असावी, असे काही नियम लागू केले होते. काही दिवस आस्थापनांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. मात्र, आजघडीला हे चित्र पालटले आहे. बहुतांश आस्थापनास्थळी सॅनिटायझर उपलब्ध नाही, सोशल डिस्टन्सिंग दिसून येत नाही.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the lives of city dwellers are in danger at gondia