"तुम्हीच सांगा, आता आम्ही जगायचं तरी कसं"? कोण विचारत आहे हा प्रश्न.. जाणून घ्या.. 

सूरज पाटील
Monday, 27 July 2020

लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर जून महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागात पोहोचला. बाधितांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे.

यवतमाळ : दिवसेंदिवस विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यात लॉकडाऊन करूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत नाही. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन हे प्रभावी औषध मानले जात आहे. मार्च महिन्यात दीर्घ कालावधीसाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा लॉकडाउन झाले तर जगायचे कसे असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.     

लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर जून महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा विषाणू ग्रामीण भागात पोहोचला. बाधितांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेची दाणादाण उडत आहे. मार्च ते मे या महिन्यांत पाळण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कष्टकरीवर्गाला घरीच बसून राहावे लागले होते त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - खजूर खा आणि आजारांना विसरा.. जाणून घ्या नियमित खजूर खाण्याचे फायदे...

लॉकडाउनमध्ये शिथिलता पण...
 
सामाजिक संस्थांनी आठवडाभर पुरेल इतकी धान्यकीट दिली. त्याचा पाहिजे तसा दिलासा अनेकांना मिळाला नाही. धान्यकीट वाटपाचा इव्हेंट सामाजिक संस्थांकडून करण्यात आला. किती दिवस घरात बसून राहायचे, या विचाराने अनेकांना चिंतेने घेरले. अखेर लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर काही प्रमाणात हाताला काम मिळाले. 

तुम्हीच सांगा जगायचे कसे 

दोन पैसे हातात पडत असताना कोरोनाचा संसर्ग आणखीच वाढला. परिणामी यवतमाळ, नेर, दारव्हा, पांढरकवडा या शहरांत आठवडाभरासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत मजुरांना घरीच बसून राहावे लागणार आहे. दुकानात काम करणाऱ्या कामगारांना अडीच महिने घरीच बसून राहावे लागले होते. व्यवसाय नसल्याचे सांगून दुकानमालकांनी त्यांच्या हातात काहीच रक्कम दिली. त्यामुळे "तुम्हीच सांगा, आता आम्ही जगायचं तरी कसं', असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

दुकानात काम करणाऱ्या कामगारांना फटका 

बाजारपेठ उघडल्यावर काहीच तासांची मुभा देण्यात आली. त्याचाही फटका दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांना बसला. काहींना तासाप्रमाणे रोज देण्यात आला. तर जुन्या असलेल्या कामगारांना अर्ध्यादिवसाचा रोज देण्यात आला. या पैशांत आम्ही करायचे तरी काय आणि शहरातील महागडा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जात आहे. कोरोनापेक्षा आता लॉकडाउनची जास्त भीती वाटते, अशी प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त होत आहे. 

कामगार, काय म्हणतात 

हाताला काम मिळेल, म्हणून आम्ही गाव सोडून यवतमाळात आलोत. दुकान उघडायला मुभा मिळताच आनंद झाला. गाडी रुळावर येण्यापूर्वीच पुन्हा घसरली. मालकही व्यवसाय होत नाही, असे म्हणत हात वर करीत आहेत. किरायाच्या खोलीचा खर्च, मुलांचे शिक्षण, आजारपण आणि त्यातच सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. कोरोना आला आणि आमचे जीवन जगणे कठीण केले, असे मत महादेव, उमेश, गजानन यांनी "सकाळ'जवळ व्यक्त केले

नक्की वाचा - अमरावतीत हे चाललंय काय! पोलिसच पोलिसांपासून नाही सुरक्षित; उघडकीस आली 'ही' धक्कादायक घटना.. 

खर्च भागवायचा कसा 
मी दहा वर्षांपासून यवतमाळ शहरातील एका दुकानात काम करतो. जुना कर्मचारी असल्याने मालकाने लॉकडाउन कालावधीतील पगार दिला. आता अर्ध्यादिवसाचा रोज मिळत आहे. माझ्या खर्च भागवायचा आणि घरी किती पैसे पाठवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- कुंदन,
कामगार, यवतमाळ. 

 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: living difficulties for labors and farmers due to lockdown