मनुष्यबळाअभावी जातवैधता कार्यालयावर 'भार', तीन दिवसांत एक हजार अर्ज

चेतन देशमुख
Monday, 28 December 2020

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे बंधनकारक आहे.

यवतमाळ : कोरोनामुळे स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी अडीच हजारावर अर्ज दाखल झालेले होते. या उमेदवारांना आता पोचपावतीवरच नामनिर्देशनपत्र दाखल करता येत आहेत. गेल्या चार दिवसांत एक हजारावर अर्ज जातवैधता प्रमाणपत्रासाठी दाखल झालेले आहेत. कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असतानाही कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन समाधानकारक आहे. सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्यानंतरही जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू होते. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. 

हेही वाचा - महापालिकेत घोट्याळांवर घोटाळे, महापौर थेट पोहोचले...

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल करणे सुरू झाले आहे. बुधवारपासून (ता.23) ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची तोबा गर्दी पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात होणारी ग्रामपंचायत निवडणुका रद्द झाल्या होत्या. त्यावेळी राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या तब्बल दोन 448 उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्राकरिता प्रस्ताव दाखल केलेले आहेत.

हेही वाचा - खुशखबर! गडचिरोलीतील गर्भवती महिलांची पायपीट थांबणार, आता तालुक्यातच मिळणार सुविधा

या उमेदवारांना केवळ पोचपावती जोडून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. 461 ग्रामपंचायतीवगळता इतर ग्रामपंचायतींसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या ठिकाणी राखीव जागांवर अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र किंवा प्रस्ताव सादर केल्याची पावती बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात एकच गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांची जातवैधता प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढलेली आहे. बुधवारी (ता. 30) नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा अंतिम दिवस आहे. तत्पूर्वी इच्छूक प्रत्येक उमेदवाराकडे किमान पोचपावती आवश्‍यक आहे. त्यामुळे सलग तीन दिवस शासकीय सुटी असतानाही जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरूच आहे. 

हेही वाचा - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अकरा गावांतील मतदार घालणार ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

'उमेद'च्या महिलांनी निवडणुकीत सहभाग नोंदवावा -
महिला सक्ष्मीकरणाच्या अनुषंगाने शासनाने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियानाची अंमलबजावणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, वित्तीय व सार्वजनिक सेवाची उपलब्धी व विकास योजना आदींचा लाभ देण्यात येतो. महिलांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सक्ष्मीकरणाबरोबर राजकीय सक्षमीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात स्वयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघाची निर्मिती करून क्षमता बांधणी केली जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर महिलांचे संघटन उभे राहिले आहे. सध्या राज्यात ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. 'उमेद' अभियानातील जास्तीत जास्त स्वयंसहायता गटाच्या सदस्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: load on cast validity office due to lack of human resource in yavatmal