वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘लॉबिंग’

मनोज भिवगडे
Friday, 13 March 2020

भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलन करण्यात आल्यानंतर दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी ॲड. प्रकाश आंबेडकर जाहीर करणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी ‘वंचित’मध्ये लॉबिंग सुरू झाली आहे. यापदासाठी  विद्यमान अध्यक्ष प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकूंद भिरड आणि ॲड. संतोष रहाटे यांच्यात स्पर्धा आहे.

अकोला : भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीत विलन करण्यात आल्यानंतर दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी ॲड. प्रकाश आंबेडकर जाहीर करणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी ‘वंचित’मध्ये लॉबिंग सुरू झाली आहे. यापदासाठी  विद्यमान अध्यक्ष प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकूंद भिरड आणि ॲड. संतोष रहाटे यांच्यात स्पर्धा आहे.

वंचित  बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवीन पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्याचा निर्णय घेतला. अकोला हा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्‍वाचा जिल्हा मानला जातो. त्यामुळे या जिल्ह्यातील कार्यकारिणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्षपद कुणाला दिले जाते याबाबत उत्सुकता आहे. दिल्ली येथे आयोजित मोर्चानंतर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जिल्हाध्यक्ष पद मिळावे म्हणून ‘वंचित’ मधील काही नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. काही नेत्यांनी यापूर्वीच बाळासाहेबांची भेट घेवून जिल्हाध्यक्षपदाचे आश्वासन मिळविले असल्याची चर्चाही पक्षात आहे. 

समन्वय समितीतील सदस्याकडेच जिल्हाध्यक्षपद?
वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी समन्वय समिती गठित केली आहे. या समितीमध्ये प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचाही समावेश आहे. या दोघांपैकी एकाची वर्णी ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षपदी लागण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. समन्वय समितीतील सदस्याकडेच जिल्हाध्यक्षपद देवून समितीला आणखी बळकट करण्याचा उद्देशही या नियुक्तीमागे असल्याचे बोललल्या जात आहे.

ओबीसी नेत्यांना अपेक्षा
लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारिप-बमसं व वंचित बहुजन आघाडीतील ओबीसी नेत्यांनी पक्षासाठी चांगले काम केले.  त्यामुळे यावेळी ओबीसी नेत्याकडेच जिल्हाध्यक्षपद येईल, अशी अपेक्षा या नेत्यांना आहे. त्यामध्ये बालमुकुंद भिरड यांचे नाव सर्वात आघाडीवर असून, त्यापाठोपाठ ॲड. संतोष रहाटे आणि कुणबी समाजातील नेते प्रदीप वानखडे यांच्या नावाची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Lobbying' for Vanchit Bahujan Aghadi District President