लॉकडाउनने बैलबाजारही बंद केला हो! कशी होणार मशागतीची कामे? 

दिनकर गुल्हाने
Monday, 4 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शेती हंगामाची संधी शोधणारा बैलबाजार गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटक प्रभावित झाले आहेत. बैल विक्री बंद असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून खरीप हंगामातील मशागतीची कामे ठप्प पडली आहे. 

पुसद (जि. यवतमाळ) : छोट्या शेतकऱ्यांची जमीन मशागतीची मदार बैलांवर अवलंबून असते. शेतीत यांत्रिकीकरण आले असले तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलांचा शेतीकामांसाठी मोठा आधार मिळतो. या बैलजोड्यांची खरेदी-विक्री मान्सूनपूर्व काळात होते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, आर्णी येथे बैलांचा मोठा बाजार भरतो. परंतु, ऐन हंगामात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बैलबाजारही बंद आहे. परिणामी शेतीच्या मशागतीची कामे थांबली आहेत. त्यामुळे बैल खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. 

आपला देश कृषीप्रधान असल्याने देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीशी निगडित असलेल्या अनेक घटकांना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पोसतो. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बैलांची आवश्‍यकता भासते. तर काही शेतकऱ्यांना बैल विक्रीतून बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैशांची जमवाजमव करावयाची असते. काहींनी त्यासाठी गाईंपासून विक्रीयोग्य गोऱ्हे तयार केलेले असतात. त्यांच्या विक्रीतून पैसाअडका मिळतो. तर काहींना बैलजोडी हवी असते. अशावेळी या खरेदी-विक्रीसाठी बैलबाजार खरीप हंगामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरते. यातून अनेक दुय्यम कामे चालतात. काही व्यापारी, दलाल बैल बाजाराच्या खरेदी-विक्रीत गुंतलेले असतात. त्यांना चार पैसे मिळतात. बैलांची शिंगे फोडणे, खुरे कापणे यांसारख्या कामातून वंचित घटकांना रोजगार मिळतो. बैल बाजारावरील छोट्या व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती या बैल बाजाराचे संचालन करीत असल्याने समितीच्या उत्पन्नात भर पडते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शेती हंगामाची संधी शोधणारा बैलबाजार गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटक प्रभावित झाले आहेत. बैल विक्री बंद असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून खरीप हंगामातील मशागतीची कामे ठप्प पडली आहे. 

अवश्य वाचा- शेतकऱ्यांवर पुन्हा आली सावकाराच्या दारात जाण्याची वेळ, का?

पुसद, शेंबाळपिंपरी, उमरखेड,आर्णी येथील बैल बाजार जिल्ह्यातील मोठे बैल बाजार आहेत. पुसद येथील बैलबाजार मधुकरनगरात चार एकरात भरतो. एका दिवशी साधारणत: 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होते. यातून कृषी उत्पन्न बाजार समितीला 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत सेस मिळतो. या बैल बाजारांमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून तसेच आदिलाबाद, निजामाबाद या भागातून विक्रीसाठी बैल मोठ्या प्रमाणावर आणले जातात. गरजू शेतकरी या बैलांची खरेदी करतात. साधारणत: एका बैलजोडीला 50 ते 80 हजार रुपये किंमत मिळते. गाईपासून घरीच तयार केलेल्या गोऱ्ह्याला विक्रीतून शेतकऱ्याला चांगली किंमत मिळते. पुढील खरीप हंगाम हा बैल शक्तीवर अवलंबून असल्याने या व्यवहाराला महत्त्व आहे. यंदा मात्र, खरीप हंगामापूर्वीच बैलबाजाराची यंत्रणा लॉकडाउनमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. बैल बाजारावर अवलंबून असणारे इतर घटक सैरभैर झाले आहेत. किमान मे महिन्याच्या मध्यात लॉकडाउन उठल्यास शेतकऱ्यांना मशागतीसाठी मोठी धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. यंदा मान्सून सात जून रोजी वेळेवर येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे बैल बाजार सुरू न झाल्यास शेतकऱ्यांची कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया छोट्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणात भरविण्यात येणारा बैलबाजार लॉकडाउनच्या काळात बंद असल्याने बाजार समितीचे उत्पन्न बुडाले आहे. शिवाय शेतकऱ्यांची बैल खरेदी- विक्री थांबल्याने मान्सूनपूर्व मशागतीवर परिणाम झाला आहे. बैलबाजार सुरू न झाल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांची कोंडी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बैल बाजार सुरू करण्यात यावा. 
-शेख कौसर शेख अख्तर 
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुसद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown has closed ox market! How will farmers works cultivation?