
वर्धा : कोरोनाच्या संसर्गापासून बचावाकरिता लॉकडाउन घोषित करण्यात आले. यात सर्वच वाहतूक ठप्प झाली. दारूची दुकानेही बंद होती. पण, तळीरामांची तलफ भागविण्याकरिता ती अवैध मार्गाने आल्याचे पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात लॉकडाउन सुरू झाल्याच्या तारखेपासून आजपर्यंत तब्बल एक कोटी 59 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
वर्ध्यात दारूबंदी असली तरी येथे दारूचे पाट वाहतात, हे नवे नाही. परंतु, राज्यात लॉकडाउन आहे. त्यातही दारूची दुकाने बंद आहेत. शिवाय जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहनेही जिल्ह्यात आणायची असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. याकरिता जिल्ह्याच्या सीमेवर तब्बल 18 चेकपोस्टवर उभे करण्यात आले आहेत. येथे 24 तास पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात आहेत. असे असताना एवढा दारूसाठा जिल्ह्यात आला कसा, हा प्रश्न सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा आहे.
अवश्य पहा- Video : एेकावे ते नवलच बोकड देतोय चक्क दूध
या दारूबंदीच्या जिल्ह्यात पोलिसांकडून तब्बल 92 लाख 96 हजार 45 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत 350 गुन्हे दाखल करून 144 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एवढी दारू जप्त करण्यात आली असली तरी तेवढीच तळीरामांच्या पोटात गेल्याचा अंदाज नाकारता येत नाही. बंदच्या काळात दारूचा आकडा वाढण्यामागे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातून चोरी गेलेला दारूसाठा एक कारण असल्याचे पोलिस सांगत आहेत.
लॉकडाउनमुळे वाहतूक बंद असल्याने दारूसाठा मिळणार नाही, असा अनेकांचा समज होता. त्यामुळे तळीरामांनी त्यांचा मोर्चा गावठी दारूकडे वळविला. ग्राहक वाढल्याने गावठी दारूनिर्मितीला जोर आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी या गावठी दारू गाळणाऱ्यांकडे मोर्चा वळविला. गावातील आणि शहरातील काही भागात पोलिसांनी वॉशआउट मोहीम राबवून 65 लाख 15 हजार 653 रुपयांची गावठी दारू नष्ट केली. ही कारवाई अद्यापही सुरूच आहे. यामुळे लॉकडाउनच्या काळात वर्ध्यात बाकी काही मिळो न मिळो, मात्र बंदी असलेली दारू मिळत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जिल्ह्यात येत असलेल्या दारूवर पोलिसांचे लक्ष आहे. यातूनच कारवाई करून एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या गावठी दारूभट्ट्यांचा शोध घेत पोलिस त्या नष्ट करीत आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.
- नीलेश ब्राह्मणे
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.