Loksabha 2019 :  राजकारण... नको रे बाबा!

प्रशांत रॉय 
सोमवार, 8 एप्रिल 2019

बसस्टॅंड असो, रेल्वेस्टेशन असो वा कॉलेजचे कॅन्टीन. राजकारणाशिवाय गप्पांचा फड पूर्णच होत नाही. गावोगावी पारावरही राजकारणाच्या गप्पा रंगतात. राजकारणाचा स्पर्श झाला नाही असे क्षेत्र विरळेच. सामान्य माणसाला राजकारणात रस आहे. परंतु, व्यवसाय म्हणून राजकारण करायचे म्हटले की नको रे बाबा.

नागपूर - बसस्टॅंड असो, रेल्वेस्टेशन असो वा कॉलेजचे कॅन्टीन. राजकारणाशिवाय गप्पांचा फड पूर्णच होत नाही. गावोगावी पारावरही राजकारणाच्या गप्पा रंगतात. राजकारणाचा स्पर्श झाला नाही असे क्षेत्र विरळेच. सामान्य माणसाला राजकारणात रस आहे. परंतु, व्यवसाय म्हणून राजकारण करायचे म्हटले की नको रे बाबा. लंडन येथील व्हॅरकी फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच संशोधनात्मक पाहणी अहवाल जाहीर केला असून, यात पहिल्या दहा सन्मानित व्यवसायांमध्ये राजकारणाला स्थान मिळालेले नाही.

लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन चॅरिटीद्वारे संचालित व्हॅरकी फाउंडेशनने ३५ देशांमध्ये याविषयी सर्वेक्षण घेतले. सहभागी देशातील हजार युवक त्यासाठी निवडण्यात आले. या सर्वेक्षणात विद्यार्थी आणि युवकांनी वैद्यकीय क्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली असून, त्याखालोखाल वकील आणि अभियंता यांचा क्रमांक लागला. एकूण १४ व्यवसायांबाबत या सर्वेक्षणात प्रश्‍न विचारण्यात आले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे पहिल्या दहा सन्मानित व्यवसायांमध्ये राजकारण हा व्यवसाय म्हणून अनेकांनी नाकारले आहे. राजकारण भ्रष्ट आहे, असे म्हणत चांगली माणसे तिकडे फिरकत नाहीत आणि चांगली माणसे राजकारणात येत नसल्यामुळे राजकारणाचा दर्जा काही सुधारत नाही, असे मत युवकांनी व्यक्त केले आहे. वाढते घोटाळे, लाचलुचपती, गुंडगिरी या सगळ्यांचे राजकीय क्षेत्रातले वाढते प्राबल्यही कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे.

लांब राहण्यातच धन्यता
सत्ता मिळविण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात; त्यास राजकारण म्हणतात. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांब राहणेच चांगले, ही मध्यमवर्गीय मनोवृत्ती. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, काहीतरी घाणेरडे, असे म्हणत त्या क्षेत्रापासून चार हात लांब राहण्यातच धन्यता मानली जाते. राजकारणी माणसाबद्दलही तीच भावना असते. यामुळे राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पर्यायाने कमी ओढा आहे, असे सहायक प्राध्यापक अविनाश थोटे म्हणाले.

सामान्य माणसाला राजकीय सहभागाची इच्छा आहे. पण त्याला पुढे घेऊन जाणारे, स्वच्छ चारित्र्याचे कुणीतरी हवे असते. वास्तविक, लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी, सोडविण्यासाठी राजकीय व्यवस्थाच सगळ्यात महत्त्वाची ठरते.
- दिनेश शर्मा, बांधकाम व्यावसायिक 

बक्कळ पैसा, मनुष्यबळ, कुठल्याही थराला जायची तयारी, हे सगळे नसल्यामुळे सामान्य माणूस राजकारणापासून बिचकून राहतो. राजकारणापासून चार हात लांबच राहायला पाहिजे, अशी सर्वसामान्य माणसाची वृत्ती असली; तरी चांगल्या माणसांनी, तरुणांनी ठरवून राजकारणात गेले पाहिजे.
- रमेश भालेराव, नागरिक, नागपूर

सन्मानित व्यवसाय
    डॉक्‍टर 
    वकील 
    अभियंता 
    मुख्य शिक्षक/प्राचार्य 
    पोलिस 
    नर्स
    लेखापाल
    स्थानिक सरकारी व्यवस्थापक 
    व्यवस्थापन सल्लागार 
    माध्यमिक शाळा शिक्षक 
(संदर्भ - व्हॅरकी फाउंडेशन)

Web Title: Loksabha 2019 Nagpur Politics