भाजपमध्ये काही "चौकीदार', काही बेखबर!

नितीन नायगावकर
मंगळवार, 19 मार्च 2019

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटच्या नावापुढे "चौकीदार' लावले. सोशल मीडियावर या अभियानाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि त्यावर ट्रोलिंगही झाले. नागपूर शहर भाजपचे काही नेतेदेखील "चौकीदार' झाले, मात्र अद्याप काही नेते या अभियानापासून अनभिज्ञ आहेत.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार' या अभियानाचा बिगुल वाजविल्यानंतर देशभरातून भाजप व चाहत्यांनी आपल्या ट्‌विटर अकाउंटच्या नावापुढे "चौकीदार' लावले. सोशल मीडियावर या अभियानाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आणि त्यावर ट्रोलिंगही झाले. नागपूर शहर भाजपचे काही नेतेदेखील "चौकीदार' झाले, मात्र अद्याप काही नेते या अभियानापासून अनभिज्ञ आहेत.
मोदी यांनी अभियानाची घोषणा केल्यावर काहीच तासांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलले होते. तर टप्प्याटप्प्याने भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या ट्‌विटर अकाउंटलाही हा बदल बघायला मिळाला. यात विशेषत्वाने महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, नवनीतसिंह तुली यांचा समावेश होतो. यातील काही नेते नियमित ट्‌विटरचा वापर करत नसले तरीही मोदी यांच्या आवाहनानंतर त्यांच्या नावापुढे "चौकीदार' लागलेले बघायला मिळाले. काही नेते नियमित ट्विट करणारे असले तरीही या अभियानापासून अद्याप ते बेखबर असल्याचे जाणवले. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते ज्याप्रमाणात "चौकीदार' अभियान फॉलो करताना दिसत आहेत, त्याप्रमाणात नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अद्याप तरी फारसे गांभिर्याने घेतलेले नाही, असे चित्र आहे. भाजपच्या या पक्षांतर्गत अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात मुंबई व पुण्याच्या तुलनेत नागपूर पिछाडीवर आहे. त्याचे पक्षाअंतर्गत परिणाम व दुष्परिणाम काय असतील, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
पक्षश्रेष्ठींचा वॉच
अभियानाला प्रारंभ केल्यानंतर पक्षातील मोठे नेते, लोकप्रतिनिधी, महत्त्वांच्या पदांवर असलेले नेते किती तत्परतेने त्याला प्रतिसाद देत आहेत, यावर वॉच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी स्वतंत्र यंत्रणा नेमल्याचे सूत्रांकडून कळते. हे अभियान फॉलो न केल्याने भाजपच्या जोरावर "दिग्गज' ठरलेल्या मंडळींवर पक्षाकडून जाब विचारला जाऊ शकतो, यालाही सूत्रांनी दुजोरा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha election news